देवेंद्र फडणवीस म्हणाले महापूर रोखण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण गरजेचे | पुढारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले महापूर रोखण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण गरजेचे

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना येणार्‍या महापुरासंदर्भात आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. कालवा काढून महापूर काळात हे पाणी दुष्काळी भागात वळवणे आणि कृष्णा-भीमा नद्यांचे स्थिरीकरण करणे, हाच आता चांगला पर्याय आहे.  त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, महापुराचा फटका बसलेल्यांना केंद्र सरकार मदत करेलच; मात्र राज्य सरकारनेही जबाबदारी झटकू नये. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कृष्णा नदीच्या महापुराने बाधित झालेल्या पलूस आणि मिरज तालुक्यातील गावांची पाहणी केली.

सांगलीतही त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्तांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे आदि उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा नदीच्या महापुराचा फटका टाळण्यासाठी हे जादाचे पाणी दुष्काळी भागात वळवायला हवे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना करणे, हाच आता पर्याच आहे.

जागतिक बँकेने हा प्रस्ताव तत्वतः मान्य केला आहे. तो प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली पाहिजेत.

महापुराने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. छोटे दुकानदार, व्यापारी बुडाले आहेत. आधीच कोरोना संकटाने त्यांची अवस्था बिकट होती, त्यात हे संकट उभे आहे.

ते म्हणाले,गोरगरीबांच्या वस्त्या पाण्याखाली होत्या. या काळात तातडीने लोकांच्या हाती मदत मिळायला हवी. तुम्हाला बँक खात्यात मदत द्यायची आहे तर द्या, मात्र लवकर द्या. दुकाने साफ करायला लोकांना पैसे हवे आहेत.

ते म्हणाले, चक्रीवादळ आल्यानंतर केंद्राने मदत दिली आहे. गुजरातला आधी तिकडे मदत दिली कारण वादळ जाऊन गुजरातमध्ये आदळले होते. तेथे अधिक परिणाम असल्याने आधी मदत मिळाली.

महाराष्ट्राने नुकसानीचा अहवाल दिल्यानंतर येथेही मदत मिळाली. आता महापुराची मदतही मिळेल. परंतु केवळ केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही.

ते म्हणाले,आम्ही आमचे सरकार असताना प्रत्येक खेपेस केंद्राकडे बोट दाखवत नव्हतो. आमच्या हिंमतीवर पैसे देत होतो. त्यामुळे राज्य सरकारनेही आता जबाबदारी टाळू नये. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी नुसती कारणे सांगून पळवाटा शोधू नयेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरण महाविकास आघाडीचे सरकार असतानाचे आहे. सरकार त्यांचे असताना भाजपचे ऐकून अधिकारी फोन टॅपिंग कशाला करतील? दर वर्षी नागरी वस्त्या पाण्यात जात असतील तर त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे.

अनेक वस्त्या या सर्व सामान्य गरीब लोकांच्या आहेत. मी ढवळीत एक दलीत वस्ती पाहिली, ती पूर्ण पाण्यात होती. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे.

‘पुढारी’च्या भूमिकेला बळ

कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराची समस्या कायमची मार्गी लावायची असेल, तर कृष्णा आणि भीमा नद्यांचे स्थिरीकरण करणे गरजेचे आहे, अशी भूमिका घेत दै. ‘पुढारी’ने वेळोवेळी वृत्तमालिका प्रसिद्ध केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापूर रोखण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची गरज बोलून दाखविल्याने दै. ‘पुढारी’च्या भूमिकेला बळ मिळाले आहे.

Back to top button