अशनी : 'तो' अशनी पृथ्वीवर आदळल्यामुळेच डायनासोर लुप्त झाले का? | पुढारी

अशनी : 'तो' अशनी पृथ्वीवर आदळल्यामुळेच डायनासोर लुप्त झाले का?

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : पृथ्वीवरील महाकाय डायनासोर कसे लुप्त झाले, हा विषय प्रत्येकाच्या जिज्ञासेचा आहे. संशोधन आपापल्या परीने त्याचा अभ्यास करत असतात. रोज नवनवीन निष्कर्ष पुराव्यांच्या आधारे सांगितले जातात. एक ‘अशनी’ (अवकाशात फिरणार्‍या लहान लहान खगोलीय वस्‍तू जेव्‍हा गुरुत्‍वाकर्षणाच्‍या कक्षेत येतात आणि जळून जाता तेव्‍हा त्‍यांना उल्‍का किंवा अशनी या नावाने ओळखले जाते.) पृथ्वीवर आदळला आणि डायनासोर प्रजाती नष्ट झाल्या, हे खरं आहे का? यासंदर्भात काही निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन’ नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

तर, त्याचं झालं असं की, ६६ कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोतील युकातान द्विकल्पात तब्बल १२ किलोमीटर रुंदीचा प्रचंड मोठा अशनी पृथ्वीवर येऊन आदळला. त्याचा प्रचंड मोठा स्फोट पृथ्वीवर झाला. त्यातून किती उष्णता निर्माण झाली, याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. हिरोसिमा-नागासाकीवर जेव्हा अणुबाॅम्ब पडला, त्यातून जेवढी उष्णता निर्माण झाली, त्याच्या कित्येक अब्जपट उष्णता हा अशनी पृथ्वीवर पडल्यामुळे निर्माण झाली होती.

अहो, इतकंच नाही, तर अमेरिका खंडावरील बहुतांश प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती जळून खाक झाल्या होत्या. वातावरणात तातडीनं बदल झाला. मोठी त्सुनामी आली. कित्येक टन धूळ वातावरणात पसरली गेली. पृथ्वीवर अंधार पसरला. या हवामान बदलामुळे पुन्हा पृथ्वीवर प्रजाती नष्ट झाल्या.

खरंच या प्रचंड मोठ्या स्फोटानंतर डायनासोर नष्ट झाले का?

या प्रश्नाचं उत्तर शोधताना संशोधकांनी प्रचंड अभ्यास केला. हा अशनी पृथ्वीवर आदळण्यापूर्वी ४० कोटी वर्षं अगोदरच डायनासोरच्या विविध प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. संशोधकांनी अभ्यास केला तो  प्रामुख्याने डायनासोरच्या ६ प्रजातींवर. त्यामध्ये डायनासोरच्या ३ मासांहारी तर ३ शाकाहारी प्रजाती होत्या.

‘ज्‍युरासिक पार्क’ या हाॅलिवुड चित्रपटात ‘टिरान्नोसाॅरीड’ आणि ‘ड्रायमोसाॅरीड’ या प्रजाती दाखविण्यात आल्या आहेत ना? या दोन प्रजाती मासांहारी होत्या. तर आकाशात पक्ष्यासारखा भरारी घेणाऱ्या ‘ट्रोओडोन्टिडा’ नावाची डायानासोरची एक प्रजातीदेखील मासांहारी होती. या ३ प्रजाती मांसाहारी होत्या.

Dinosaurs

उरलेत्या ३ डायनासोरच्या प्रजाती शाकाहारी होत्या. त्यामध्ये डोक्यावर शिंगे असलेला सेराटोप्सिड, डायनासोरच्या प्रजातींमध्ये महत्वाचा असणारा हेड्रोसॉरीड आणि ज्याच्या पाठीवर मगरीसारखी काटेरी त्वचेची ढाल असणारा अँकिलोसॉरीड, अशा ३ प्रजाती शाकाहारी होत्या.

तत्कालीन परिस्थितीत पृथ्वीवर डायनासोरच्या किती प्रजाती होत्या, हे शोधण्यासाठी मागील ५ वर्षांपासून संशोधकांनी अभ्यास केला. संशोधकांना सापडलेले ६ डायनासोरचे जिवाश्म हे तब्बल २५० प्रजातींचे प्रतिनिधीत्व करतात. डायनासोरचं संशोधन करण्यासाठी सांख्यिकीय माॅडेल वापरण्यात आलं होतं.

या संशोधनामध्ये १६० आणि ६६ कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरच्या प्रजातींच्या शोध संशोधकांनी लावला. त्यांनी असं सांगितलं की, पृथ्वीवर तो अशनी आदळण्यापूर्वीच १० कोटी वर्ष जुने असणारे डायनासोर हळूहळू लुप्त झालेले होते.आता हे डायनासोर कसे नष्ट झाले, त्याचीही मोठी गंमत आहे.

या लुप्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये डायनासोरच्या मांसाहारी आणि शाकाहारी प्रजाती होते. त्यात अँकिलोसॉर आणि सिरेटोप्सियन नावाच्या प्रजातील वेगाने नष्ट झाल्या. सहा प्रजातींपैकी ५ डायनासोरच्या प्रजाची लवकर नष्ट झाल्या. पण, एक प्रजाती नष्ट झाली नव्हती, तर त्यात घट झाली होती. त्या प्रजातीचं नाव ट्रॉव्हॉन्टायड्स असं होतं. ही प्रजाती अलिकडे म्हणजे ५ लाख वर्षांपूर्वी नष्ट झाली.

अशनीच्या आदळण्यामुळे नाहीतर, कशामुळे डायनासोर नष्ट झाले? 

वातावरणातील बदल, हे मोठं कारण डायनासोरच्या प्रजाती नष्ट होण्यामध्ये आहेत. तत्कालीन परिस्थितीत पृथ्वीवरील तापमान ७-८ अंश सेल्सियसपर्यंत गेलेलं होतं. डायनासोर जगण्यासाठी पृथ्वीवर विशिष्ट तापमानाची गरज होती. त्यांच्या पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी तापमानाची गरज होती. मात्र, ते तापमान पृथ्वीवर नष्ट झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डायनासोरच्या प्रजातींवर झाला.

संशोधनात असंही सांगितलं आहे की, “डायनासोरला अनुकूल असणारं तापमान कमी झाल्यामुळे डायनासोर लुप्त झाले. त्यात पहिल्यांदा शाकाहारी डायनासोरच्या प्रजाती नष्ट झाल्या, त्यानंतर मासांहारी डायनासोरच्या प्रजाती नष्ट झाल्या असाव्यात”, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

महत्वाचं हे आहे की, तो अशनी पृथ्वीवर आदळला नसता तर काय झाले असते? अगोदरच लुप्त पावणाऱ्या डाययासोरच्या प्रजाती ग्रह आदळल्यामुळे वेगाने नष्ट झाल्या. बऱ्याच संशोधकांचं असं म्हणणं आहे की, डायनासोर पृथ्वीवर टिकले असते. तर, माणूसच कधी दिसू शकला नसता. या संशोधनातून निष्कर्ष इतकाच निघतो की, वातावरणात मोठ्या प्रमाणात झालेल्या बदलामुळे डायनासोर लुप्त होत होते, त्यात पृथ्वीवर ६६ कोटी वर्षापूर्वी आदळलेल्या अशनीची भर पडली. बहुतांशी पृथ्वीवरील एखाद्या प्रजातीसंदर्भात लुप्त होण्याची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू होते. नंतर एखादी भयंकर घटना घडते. त्यात पूर्णपणे प्रजाती नष्ट होऊन जातात.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरात आदिमानवाच्या अस्तित्वाचे पुरावे

Back to top button