

सांगली महापूराची स्थिती पाहता जिल्ह्यात पुराला संथगतीने उतार येत आहे. दिवसभरातील काही जोरदार सरींचा अपवाद वगळता जिल्ह्यातील व धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस रविवारी पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोयना, चांदोलीसह अन्य धरणांतील पाणी सोडण्याचे प्रमाण कमी केले आहे.
परिणामी सांगलीसह शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील महापूर कूर्मगतीने का होईना, पण ओसरू लागला आहे. बहे, ताकारी, भिलवडी येथे पाणी हळूहळू कमी होत आहे. सांगलीत सायंकाळी सहा वाजल्यापासून पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे.
सोमवारी (दि.26) पाणी पूर्णपणे नदीपात्रात जाण्याची शक्यता आहे. रस्ते, पुलावर कचरा अडकल्याने वाहतूक मात्र मंगळवारी खुली होईल.
पूर ओसरत असला तरी अजूनही लाखो लोक आणि हजारो जनावरे निवारा केंद्रात आहेत. शंभरपेक्षा अधिक रस्ते पाण्याखाली आहेत.सलग तिसर्या दिवशी नदीकाठचे लाखो लिटर दूध संकलन ठप्प आहे.
सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे तसेच धरणांतून पाणी सोडल्याने गुरुवारी कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी अतिशय झपाट्याने वाढले. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी सांगली शहरासह जिल्ह्यातील नदीकाठाला महापुराचा विळखा पडला. प्रामुख्याने शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील सुमारे 25 हजार कुटुंबातील दीड लाख लोकांना बाहेर पडावे लागले. तसेच लहान व मोठ्या 30 हजार जनावरांचेही स्थलांतर करावे लागले.
महापुराने शंभरपेक्षा अधिक गावे बाधित झाली आहेत. मिरज तालुक्यात 19, वाळवा तालुक्यात 37, शिराळा तालुक्यात 14 , पलूस तालुक्यातील 23 गावे बाधित आहेत. त्याशिवाय अनेक वाड्या-वस्त्यांना महापुराचा विळखा कायम आहे.
महापालिका क्षेत्रातील सुमारे दीड ते दोन हजार कुटुंबांमधील दहा हजार, मिरज ग्रामीणमधील 350 कुटुंबातील तीन हजार, सांगली ग्रामीणमधील पाच हजार कुटुंबातील 20 हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. वाळवा तालुक्यातील अंदाजे आठ हजार कुटुंबातील 40 हजार, आष्टा परिसरातील एक हजार कुटुंबातील चार हजार, शिराळा तालुक्यातील 1085 कुटुंबातील पाच हजार, पलूस तालुक्यातील सात हजार कुटुंबातील 35 हजार व्यक्तींचे स्थलांतर प्रशासनाने केले आहे. मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील हजारो जनावरेही बाहेर काढली आहेत. जिल्ह्यात 15 मोठी जनावरे व 18 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता रविवारी इतर ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. तसेच कोयना धरण भागात गेल्या 24 तासात (शनिवारी ते रविवारी) 108 मिमी पाऊस पडला. नवजाला 110 व महाबळेश्वरला 173 मिमी पाऊस पडला. धोमला 22, कण्हेरला शून्य व कराड भागात 4 मिमी पाऊस पडला. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयनाला 25, नवजाला 20, महाबळेश्वरला 35 मिमी पाऊस पडला आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांत पाण्याची आवक कमी झाली आहे. कोयना धरणात प्रतितास 75 हजार क्युसेक येत आहे. धरणातील 84 टीएमसी पाणीसाठा कालपासून स्थिर आहे. पाऊस ओसरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला होता. काल 35 हजार असणारा विसर्ग आज दिवसभरात आणखी कमी केला होता. सायंकाळी सहा वाजता कोयनेतून 30 हजार क्युसेक पाणी प्रतिसेंकदाला सोडले जात होते. धोम, कण्हेरमधूनही सुमारे सात ते पाच हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.
यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळीत हळूहळू कमी होऊ लागली आहे. कराडमधील कोयना पूल येथे शनिवारी 58 फूट असणारे पाणी रविवारी सायंकाळी सहा वाजता 33 फुटांपर्यंत कमी झाले. कराडमधील कृष्णा पूल येथे पाणी 51 फुटांवरून 26 फुटांपर्यंत कमी झाले होते. त्या पुलावरून वाहतूक सुरू झाली होती.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे पुलाजवळ शनिवारी 33 फूट असणारे पाणी रविवारी सायंकाळी 18 फूट झाले होते. ताकारी पूल येथे पाणी 65 वरून 55 फुटापर्यंत कमी झाले होते. भिलवडी पूल येथे 60 फूट असणारे पाणी रविवारी रात्री 58 फूट झाले होते. रात्री दहा वाजता या सर्व ठिकाणचे पाणी आणखी दोन ते तीन फुटांनी कमी झाले. सांगलीत मात्र सकाळपासून पाणी वाढतच राहिले. आयर्विन पुलाजवळ 55 फूट अशी सर्वोच्च पाणीपातळी झाली.
सायंकाळी सहा वाजल्यापासून शहरातील पाण्यास उतार लागला. मात्र केवळ सहा इंच पाणी सात वाजेपर्यंत उतरले होते. रात्री दहा वाजता पाणी एक फूट कमी झाले. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील व सांगलीतील पाणी आणखी चार-पाच फूट कमी होण्याची शक्यता आहे.
चांदोली धरण परिसरातीलही पावसाचा कमी झाला आहे. धरणात सध्या प्रतितास 30 हजार क्युसेक पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग शनिवारी 19 हजार, सायंकाळी 16 हजारपर्यंत कमी केला होता. आज यात आणखी कपात करण्यात आली. रविवारी सायंकाळी उशिरा चांदोलीतून केवळ आठ ते 9 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे पाणी रात्री उशिरा कमी होऊ लागले. यामुळे वारणा काठाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
दोन्ही नद्यांचे पाणी सोमवारी सायंकाळपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री पाणी पूर्णपणे पात्रात जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.