महापुराचा वेढा असतानाही कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ | पुढारी

महापुराचा वेढा असतानाही कोल्हापुरात ‘पाणीबाणी’

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरमध्ये ‘पाणीबाणी’ सारखी स्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि जिल्ह्यास महापुराचा वेढा असतानाही शहरास पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.

पाणी उपसा केंद्रे पाण्यात गेल्याने शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ‘पाणीच पाणी चोहीकडे पिण्यास पाणी नाही कुणाकडे’ अशी अवस्था शहरवासीयांची झाली आहे. महापुराच्या काळातही शहरात पाणीबाणी सुरू आहे.

दरम्यान, टँकर पळवापळवी आणि वादावादीच्या पार्श्वभूमीवर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कळंबा फिल्टर हाऊस येथे भेट देऊन दोन तास थांबून पाणी वाटपाचे नियोजन केले.

पंचगंगा नदीने विक्रमी 56 फूट तीन इंच पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर जलमय बनले आहे. शहरास पाणी पुरवठा करणार्‍या शहरातील पाणीपुरवठा विभागाच्या पाणी उपसा केंद्रात महापुराचे पाणी घुसल्याने ही केंद्रे बंद आहेत. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी अबालवृद्धांसह महिलांची दमछाक होत आहे. अनेकांनी बाटलीबंद पाण्याचा आधार घेतला असला तरी बाटलीबंद पाण्यबाबतही नागरिकांची फसवणूक सुरू आहे. कुठेतरी बोअरचे पाणी भरून शुध्द पाण्याच्या नावाखाली बाटल्या विकल्या जात आहेत.
महापालिकेने ट्रँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन केले असून टँकर मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. कळंबा आणि बावडा फिल्टर हाऊसमध्ये टँकर घेण्यासाठी माजी नगरसेवकांत वादावादीचे किरकोळ प्रकार घडले.

टँकर मिळविण्याची चढाओढ आणि वादावादीचे प्रकार लक्षात घेऊन कळंबा फिल्टर हाऊस आणि कसबा बावडा फिल्टर हाऊसला पोलिस बंदोबस्त तैनात केलाआहे.

पूर उतरण्याचा वेग अत्यंत संथ

शनिवारपासून पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे नागरिकांना महापुरापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणी उतरण्याचा वेग अत्यंत संथ असल्याने शहरात अनेक भागात पाणी ‘जैसे थे’ आहे. दोन दिवसांच्या उघडिपीमुळे पाण्याखाली गेलेले रस्ते हळूहळू खुले होऊ लागले आहेत.

दोन-तीन दिवस पुराच्या पाण्याखाली राहिलला भाग खुला झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात साठलेला चिखल काढण्यासाठीची स्वच्छतेची कामे महापालिका यंत्रणेसह लोकांनीही सुरु केली आहेत.

दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अवघे शहर जलमय झाले होते. शहरातील शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, सिध्दार्थनगर, महावीर कॉलेज, न्यू पॅलेस परिसर, कसबा बावडा, मार्केट यार्ड, नागाळा पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर अशा मध्यवर्ती भागात 4 फुटांपासून ते 10 फुटांपर्यंत पाणी शिरले होते. यामुळे हजारो पूरग्रस्तांना आपली घरे सोडून निवारा केंद्र व अन्य ठिकाणी जावे लागले होते. शनिवार व रविवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला.

शहरातील हे मार्ग झाले खुले

शनिवारी रामानंदनगर परिसरातील पाणी कमी झाल्याने हॉकी स्टेडियम चौक ते रिंगरोड रस्ता खुला झाला तर परिख पुलाखालील पाणी कमी झाल्याने सीबीएस चौक ते शाहूपुरी-राजारामपुरी रस्ता खुला झाला. तसेच राजारामपुरी जनता बाझार चौकातील पाणी उतरल्याने बागल चौक ते टाकाळा चौक हा रस्ता खुला झाला. तसेच टाकाळा ते सायबर चौक मार्गावरील पाणीही उतरल्याने रस्ता खुला झाला. रविवारी सिध्दार्थ नगरातील पाणी कमी झाल्याने सीपीआर चौक ते तोरस्कर चौक रस्ता खुला झाला. फोर्ड कॉर्नर परिसरातील पाणी उतरल्याने दसरा चौक ते उमा टॉकीज चौक रस्ता खुला झाला. उर्वरित रस्ते अद्यापही पुराच्या पाण्याखालीच आहेत.

Back to top button