

कागल : पुढारी वृत्तसेवा
कागल येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय अज्ञातांनी पेट्रोल टाकून बुधवारी मध्यरात्री पेटवून दिले. यामुळे कार्यालयातील दैनंदिन तसेच अतिमहत्त्वाची कागदपत्रे, बारा संगणक व प्रिंटर जळून खाक झाले. कार्यालयीन वस्तूदेखील मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. पोलिसांनी कार्यालयाच्या खिडकीमध्ये ठेवलेल्या पेट्रोलच्या बाटल्या, आगपेटी जप्त केली आहे. या आगीमध्ये केबिनदेखील जळून खाक झाल्या. ही घटना मध्यरात्री सव्वादोनच्या दरम्यान घडली. आगीत 8 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असलेल्या छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या ड्युटीवरील वॉचमनला मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीमधून आग आणि धूर बाहेर येत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेचच विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. कार्यालयाची दोन्ही गेट बंद होती. त्यामुळे वॉचमन यांनी गेटमधून आरडाओरडा करून कर्मचार्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला. मशिन रूममध्ये सुनील मुसळे हे ऑपरेटर काम करीत होते. त्यांना कार्यालयाला आग लागल्याचे सांगण्यात आले. कार्यालयातून आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होता.
त्यांनी तत्काळ कार्यालयाशेजारी राहत असलेल्या शिपाई सोहम स्वामी यांना बोलावून घेतले. स्वामी यांनी ही घटना अधिकार्यांना फोनवर सांगितली व नगरपालिका आणि छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या फायर स्टेशनला फोन करून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून घेतल्या. या दोन्ही गाड्यांनी आग आटोक्यात आणली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सतीश माळी, अमोल आंबी, राजू पांडागळे व अनिल वड यांनी आग आटोक्यात आणली.
याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक गच्चे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीमध्ये पेट्रोलने भरलेल्या चार बाटल्या आणि आगपेटी आढळून आल्या आहेत.
या आगीमध्ये वायरी वितळल्या आहेत. लाकडी कपाटाला धग लागल्यामुळे कपाटातील कागदपत्रेदेखील जळालेली आहेत. टेबल-खुर्च्यादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. एलसीबीचे प्रमुख संजय गोरले, करवीर विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. तसेच विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अंकुश कावळे, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे व विनोद घोलप यांनीदेखील भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. नवीन कनेक्शनसाठी आलेले अर्ज, माहिती अधिकारासाठी आलेले अर्ज, ऊस जळीत प्रकरणे, नुकसानभरपाई प्रकरणे, कॉन्ट्रॅक्ट बिले अशी विविध प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे आगीमध्ये जळून खाक झाली आहेत.
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे कार्यालय बेवारशी राहिले आहे. येथील अधिकार्यांना कोणतेही सोयरसूतक उरलेले नाही. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात आलेला नाही. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोकांची महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली आहेत.
कागल शहरात आतापर्यंत नगरपालिका कार्यालय, बसस्थानक कार्यालय आणि आता विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय पेटवण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. कोणत्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल नेण्यात आले, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच जवळपासचे सीसीटीव्ही कॅमेरे, पेट्रोल पंपांवरील कॅमेरे टोल नाक्यावरील कॅमेरे तपासले जात आहेत.
छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या वॉचमननी वेळीच लक्ष दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला लागलेली आग लक्षात आली. आणखी काही वेळ झाला असता, तर कार्यालयातील उरलासुरला भागही जळून खाक झाला असता. त्यामुळे ड्युटीवर असलेल्या वॉचमेन यांचे कौतुक केले जात आहे.