आमदार रवी राणा यांचा इशारा; अनिल परबांसह अनेक मंत्री ईडीच्या रडारवर | पुढारी

आमदार रवी राणा यांचा इशारा; अनिल परबांसह अनेक मंत्री ईडीच्या रडारवर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या काळात अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला अनेक मंत्री तसेच राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर याही ईडीच्या रडारवर आहेत. १२०० कोटी रुपयांचा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली. ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल करून माझ्यावर राज्यात येण्याची बंदी घातली. परंतु जामीन मिळवून ते नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

पालकमंत्र्यांनी कट रचून फसवले

आमदार रवी राणा म्हणाले, मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्र्यांनी कट रचून माझ्या विरोधत कारस्थान रचले. माझ्या विरोधात ३०७ सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या दबावात झाले असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडी सरकार खोटे गुन्हे दाखल करून आमदाराला फसवत असेल, तर सामान्य जनतेचे काय हाल होणार, असा प्रश्‍न राणा यांनी केला.

येत्या काळात अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असणारे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. मुख्यमंत्र्यांची तर फाईलच उघडून ठेवली आहे, असे राणा यांनी सांगितले. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना होती. ही शिवसेना नसून काँग्रेससेना आहे. मला थांबवू शकेल एवढी धमक शिवसेनेत नाही, असे आमदार रवी राणा म्हणाले.

 

Back to top button