Ukraine-Russia : भारत-पाकप्रमाणे कधी काळी एकच होेते युक्रेन आणि रशिया | पुढारी

Ukraine-Russia : भारत-पाकप्रमाणे कधी काळी एकच होेते युक्रेन आणि रशिया

मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हा सगळा भूभाग जसा एकेकाळी भारत होता, तसेच रशिया आणि युक्रेन (Ukraine-Russia) मिळून एकेकाळी हा एकच देश होता. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या ‘पॅरेस्त्राईस्का अँड ग्लासनोस्त’ धोरणांचा परिणाम म्हणून 1990 मध्ये सोव्हिएत युनियनची फाळणी झाली. अर्थात युक्रेन आणि बेलारूस या दोन्ही शेजारी देशांना रशिया आपल्या लहरीप्रमाणेच चालवत आला आहे.

रशियाच्या पाठबळावर येथे सरकारेही स्थापन झाली. युक्रेनमध्ये 2014 मध्ये क्रांती झाली आणि रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना पद सोडावे लागले. यामुळे नाराज झालेल्या रशियाने युक्रेनमधील क्रिमिया या मोठ्या भागावर कब्जा जमविला. क्रिमियात रशियन मूळ असलेले लोक बहुसंख्य आहेत, हे कारण त्यामागे रशियाने दिले.

अर्थात 2014 मध्येच युक्रेनवर हल्ल्याचा आराखडा तयार करणे रशियाने सुरू केले होते. युक्रेनच्या डोनॅट्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांबाबतही रशियाने क्रिमियाप्रमाणे धोरण राबविले. या दोन्ही प्रांतांवरही 2014 मध्येच रशिया समर्थक बंडखोरांनी कब्जा जमविला होता. स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले होते.

रशियाने या दोन्ही भागांना मंगळवारी स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली बुधवारी आपले सैन्य घुसविले आणि गुरुवारी हल्लाही सुरू केला. यानुकोविच युक्रेनमध्ये पायउतार होईपर्यंत (2014) रशिया-युक्रेनमध्ये मजबूत ‘याराना’ होता. ते पायउतार झाल्यानंतर युक्रेनमध्ये (Ukraine-Russia) रशियाविरोधी सरकार स्थापन झाले आणि हा ‘याराना’ ‘जानी दुश्मनी’त बदलला!

Back to top button