मिरज : लतादीदींनी ‘वॉन्लेस’ला दिली होती बारा लाखाची देणगी | पुढारी

मिरज : लतादीदींनी ‘वॉन्लेस’ला दिली होती बारा लाखाची देणगी

मिरज : जालिंदर हुलवान

गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर व त्यांच्या कुटुंबाने वॉन्लेस हॉस्पिटलच्या बांधकामासाठी 1971 मध्ये तब्बल 12 लाख रुपये देणगी दिली होती. लता दीदींच्या निधनानंतर या आठवणींना उजाळा मिळाला.

Wanless Hospital – वॉन्लेस हॉस्पिटल 

मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटल हे सर्वात जुने हॉस्पिटल आहे. 128 वर्षे या हॉस्पिटलला पूर्ण झाली आहेत. 1962 च्या पूर्वी जुन्या दगडी बांधकामामध्ये हे हॉस्पिटल होते. ती इमारत कमी पडत होती. त्यामुळे त्यावेळच्या प्रशासनाने नव्याने बांधकाम करून मोठी इमारत बांधण्याचे ठरविले होते. 1962 सालापासून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले. त्यासाठी अनेकांनी हातभार लावला. 1971 सालापर्यंत टप्याटप्याने बांधकाम सुरु होते. तत्कालीन संचालक डॉ. आर्चिबाल्ड फ्लेचर यांनी फंड रेजिंग करायचे ठरविले. डॉ. मनोहर रणभिसे यांनी लगेच तयारी सुरू केली. लतादीदी या सांगलीच्या असल्याने त्यांना संगीत रजनी या कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने लता दीदींची भेट झाली. त्यांच्या शब्दाला मान देऊन व डॉ. विल्यम वॉन्लेस यांचे कार्य लक्षात घेऊन, लतादीदी येण्यास तयार झाल्या.

लता दीदी येणार ही बातमी वार्‍या सारखी पसरली होती. वॉन्लेस प्रशासन व कर्मचारी तयारीला लागले. हॉस्पिटलचे अधीक्षक जॉर्ज मसोजी यांच्याकडे कार्यक्रमाची व्यवस्था सोपवण्यात आली. हॉस्पिटलच्या समोरच कॅमेरन शाळेचे पटांगण उंच उंच पत्रे लावून बंदिस्त करण्यात आले. मोठे व्यासपीठ उभारण्यात आले. मिरज शहरात सर्व मिळून सुमारे 10 हजार खुर्च्या नव्हत्या. त्यामुळे या कार्यक्रमासाठी सातारा व कराडहून खुर्च्या आणल्या होत्या. अधिकारी, नेते यांच्यासाठी खास खुर्च्या पुढील बाजूस मांडण्यात आल्या. लहान मुलांसाठी ताडपत्री घालण्यात आली. सायकली ठेवण्यास भले मोठे पटांगण तयार केले होते. गरम भजी, चहा, भडंग यांची छोटी दुकाने उभी करण्यात आली होती. जत्रे प्रमाणे लोक सकाळपासून आजूबाजूच्या गावा मधून गोळा झाले होते. दि. 21नोव्हेंबर 1971 रोजी लतादीदी आल्या. उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अनिल मोहिले, अरुण पौडवाल हेही त्यांच्या समवेत होते. अमीन सयानी सूत्रसंचालानासाठी आले होते. प्रसिद्ध नर्तकी अभिनेत्री सुधा देखील त्यांच्या समवेत होती. दीदी व त्यांच्या सहकार्‍यांनी वीस गाणी गायिली. सगळा जनसमुदाय दीदींचा मंजुळ आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाला.

दीदी व त्यांची टीम फ्लेचर हॉल याच ठिकाणी राहिली. सकाळी दीदी पुन्हा मुंबईस रवाना झाल्या. या कार्यक्रमासाठी लातादीदींनी काहीही मानधन घेतले नाही. उलट त्या काळात 12 लाख रुपये इतकी मोठी रक्कम त्यांनी वान्लेस हॉस्पिटलसाठी उभी केली आणि त्यांनी ती रक्कम बांधकामासाठी दिली.

काहींचा विरोध डावलून दीदी आल्या…

हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम होऊ नये आणि जमलेला निधी हॉस्पिटलला देऊ नये, अशी इच्छा काहींची होती. मात्र त्यांचा विरोध डावलून दीदी या कार्यक्रमासाठी आल्या आणि त्यांनी तो निधी हॉस्पिटलसाठी दिला.

पाहा व्हिडीओ : अमर अमृत स्वर… लता मंगेशकर यांना आदरांजली.. | Pudhari | Lata Mangeshkar

Back to top button