नारायण राणे : महाड महापुरासंदर्भात केंद्रातून तज्ज्ञ मंडळींमार्फत निरीक्षण करणार | पुढारी

नारायण राणे : महाड महापुरासंदर्भात केंद्रातून तज्ज्ञ मंडळींमार्फत निरीक्षण करणार

महाड : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोकणात प्रामुख्याने महाड चिपळूण येथे झालेल्या महापुरासंदर्भात केंद्र शासनाच्या तज्ज्ञ मंडळांमार्फत उच्चस्तरीय पाहणी करणार असल्याचे सांगितले. तसेच या संदर्भात राज्यातील तसेच संबंधित गावांतील मंडळींबरोबर आपण तातडीने नवी दिल्लीमध्ये बैठक घेणार असल्याचेही राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी महाड पूरग्रस्त नागरिकांना केंद्र शासनाच्या वतीने तसेच अर्थ मंत्रालयामार्फत मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेला कोकणातील नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी पाली येथून सुरुवात करून महाड येथे रायगड जिल्ह्यांमध्ये यात्रेची समाप्ती करताना पी जी सिटी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये रोखठोक उत्तरे दिली.

राज्यातील शासनाकडून हिंदूंच्याच सणांना विरोध झाल्यास हे सण साजरे व्हावेत म्हणून आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे स्पष्ट करून महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य राहिले नसल्याचा आरोप केला. स्वतः पिंजऱ्यात राहून बाकीच्यांवर बंदी आणण्याचा दुर्दैवी प्रकार राज्यात सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कोकणाच्या व देशाच्या भवितव्यानं नाणार प्रकल्प आवश्यक असून तो तातडीने व्हावा यासाठी आपण सकारात्मक असल्याचे राणे यांनी सांगितले. याविषयी असलेल्या पर्यावरणासंदर्भातील विविध योजना करण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या तीन जिल्ह्यांतील ठेकेदारांची कामे सिंधुदुर्गमध्ये योग्य पद्धतीने झाली असून रायगड व रत्नागिरी मधील ठेकेदारांना तातडीने बदलून त्यांच्या ठिकाणी नवीन नियुक्ती करताना त्यांच्यावर नऊ महिन्यांमध्ये या रस्त्यांची पूर्तता करावी अशी अट घालण्यात यावी अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना सांगितले.

म्हाडा वसाहतीमधील कारखानदारांसाठी विमा कंपन्यांकडून अर्धी रक्कम मिळण्याबाबत विचारले असता त्यांनी हा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्र्यांची संबंधित असल्याने त्यांच्याशी बोलून जास्तीत जास्त मदत देण्याकरता आपण सहकार्य करू असे सांगितले.

जनआशीर्वाद यात्रेला कोकणवासियांकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल कोकणवासीयांना धन्यवाद देऊन केंद्र शासनाच्या वतीने सुरू केलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ही सूचना आपण या यात्रेच्या निमित्ताने पूर्ण करत असल्याचे सांगतानाच देश महासत्ता व्हावा म्हणून पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

भारत देशाची जगात प्रतिष्ठा वाढली असून ती कायम ठेवण्याकरिता पंतप्रधान मोदी करत असलेल्या विविध उपाययोजनांचे समर्थन करताना कोकणवासीयांनी देखील या विविध योजनांना सहकार्य करावे असे आवाहन केले जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकारांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच ही यात्रा यशस्वी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी रायगड दक्षिण जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी या यात्रेचे स्वरूप विशद करून रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या यात्रेला रायगडवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नीलेश राणे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेपूर्वी महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नारायण राणे यांनी अभिवादन केले व पुष्पहार अर्पण केला त्यानंतर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या व्यापारी मित्रांच्या बैठकीमध्ये त्यांनी व्यापा यांच्या प्रश्नांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यानंतर माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या भेटीदरम्यान स्थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button