औरंगाबाद : एपीआयच्या मुलाकडून उकळले दीड लाख! | पुढारी

औरंगाबाद : एपीआयच्या मुलाकडून उकळले दीड लाख!

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : वर्क फ्रॉम होम करा आणि पैसे कमवा, असे आमिष दाखवून सायबर भामट्याने औरंगाबाद येथील सहायक पोलीस निरीक्षकाच्या मुलाकडूनच तब्बल एक लाख 59 हजार रुपये उकळले.

हा प्रकार समोर आल्यावर पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिस दलात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बोंडेकर (रा. राणाजी हॉलजवळ, एन- 8, सिडको, औरंगाबाद ) यांचा मुलगा दहावीत आहे. कोरोनामुळे त्याचा ऑनलाईन क्लास सुरू आहे. त्यासाठी मुलगा बोंडेकर यांचाच मोबाइल वापरतो.

15 जून रोजी क्लास सुरू असताना मुलाने प्रशांत यांचे टि्वटर खाते उघडले. त्यावर त्याला वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यातील चॅट बॉक्समध्ये जाऊन मुलाने नोंदणी करायची आहे, असा मेसेज पाठविला.

त्यानंतर त्याला क्षणात भामट्याचे उत्तर आले. भामट्याने एक व्हॉटसअ‍ॅप क्रमांक पाठवून त्यावर मेसेज करायला सांगितला.

मुलाने भामट्याच्या मोबाइलवर मेसेज पाठवला. त्यानंतर तुम्हाला जर वर्क फ्रॉम होमसाठी तुम्हाला एक लिंक पाठवू. त्या लिंकवर प्रत्येक क्लिक करता 120 ते 150 रुपये मिळतील, असे आमिष भामट्याने दाखविले.

सात दिवसांत असे लुबाडले पैसे

वर्क फजएॉम होमसाठी जॉईन होण्याकरिता अगोदर 999रुपये भरावे लागतील, असे सांगून भामट्याने हळूहळू पैसे उकळले. त्याने पैसे भरण्याकरिता टि्वटरवर खाते क्रमांक पाठवू असा मेसेज केला.

लगेचच अमित रय नावाने एसबीआय बँकेचा खाते क्रमांक पाठविला. प्रशांत यांच्या पेटीएमचा पासवर्ड माहिती असल्याने मुलानेही लगेचच 999 रुपये पाठविले.

पैसे मिळताच भामट्याने पुन्हा मेसेज करून सुरक्षा ठेव म्हणून चार हजार 999 रुपये भरायला सांगितले. मुलानेही काहीच
विचार न करता पुन्हा पेटीएमद्वारे पैसे पाठविले.

16 जूनला भामट्याने पॅकेज खरेदी करण्यासाठी सहा हजार तीनशे रुपये व दोन हजार 699 असे एकूण आठ हजार 999 रुपये पाठवायला सांगितले.

तसेच, टि्वटरवर प्रवीणकुमार सिंग या नावाने गुगल पे आयडी पाठविला. त्या आयडीवरही मुलाने 17 जून रोजी पैसे पाठविले.

18 जूनला अ‍ॅप व लिंक तयार करण्यासाठी 25 हजार रुपये, 19 जून रोजी भरलेले पैसे रिफंड कार्ड खरेदीसाठी 40 हजार रुपये भरायला सांगितले. मुलाने तेही पैसे पाठविले.

मात्र, त्यानंतरही लिंक न आल्याने मुलाने 20 जून रोजी भामट्याच्या मोबाइलवर संपर्क साधत वर्क फजएॉम होमसाठी लिंक उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.

तेव्हा भामट्याने तुम्हाला भरलेल्या पैशाचा रिफंड मिळेल व सर्व प्रक्रियेसाठी एक ते दोन दिवस लागतील असे सांगितले.

परंतू भामट्याने पुन्हा 21 जूनला सर्व प्रकियेसाठी उशीर झाल्याने तुमची लिंक फेल झाल्याचे सांगितले. तसेच, तुम्हाला ही प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.

तसेच भरलेले पैसे रिफंड मिळतील अशी थाप मारून 22 जून रोजी दोन टप्प्यात 80 हजार रुपये उकळले.

अशाप्रकारे भामट्याने सहायक पोलिस निरीक्षकाच्या मुलाकडून एक लाख 59 हजार 997 रुपये उकळले.

Back to top button