स्पेस एक्स ची ‘आईस्क्रीम डिलिव्हरी’! | पुढारी

स्पेस एक्स ची ‘आईस्क्रीम डिलिव्हरी’!

वॉशिंग्टन : स्पेस एक्स ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर रसद घेऊन आपले यान पाठवले आहे. हे यान सोमवारी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या स्थानकावर पोहोचले. या यानातून मुंग्या, एवोकाडो फळे, रोबोटिक भुजा आणि आईस्क्रीमही पाठवण्यात आले आहे. एका दशकाच्या काळात ‘नासा’साठी कंपनीने पाठवलेली ही 23 वी खेप आहे.

पुनर्वापर करता येऊ शकणार्‍या फाल्कन रॉकेटच्या सहाय्याने हे ‘ड्रॅगन’ नावाचे यान ‘नासा’च्या केनेडी अवकाश केंद्रावरून पाठवण्यात आले. ड्रॅगन कॅप्सूल पाठवल्यानंतर त्याच्या पहिल्या टप्प्यात बूस्टर स्पेस एक्स च्या अद्ययावत महासागरीय मंच ‘अ शॉर्टफॉल ऑफ ग्रेव्हिटास’वर उतरले.

‘स्पेस एक्स’चे संस्थापक एलन मस्क यांनी दिवंगत विज्ञान कथा लेखक इयान बँक्स यांना या यानाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केलेली आहे. या यानाने 2170 किलोपेक्षाही अधिक वजनाची साहित्यसामग्री स्थानकावर नेली आहे.

त्यामध्ये वैज्ञानिक प्रयोगांसाठीची उपकरणे व अन्य वस्तू तसेच स्थानकावर राहत असलेल्या अंतराळवीरांच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामध्ये अगदी लिंबू आणि आईस्क्रीमही आहे. ‘गर्ल स्काऊटस्’ मुंग्या, खारट झिंगा आणि अनेक रोपेही पाठवण्यात आली आहेत.

Back to top button