बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे ‘ते’ मासिक बाजारात दिसलेच नाही! | पुढारी

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे ‘ते’ मासिक बाजारात दिसलेच नाही!

पुढारी ऑनलाईन डेस्क

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील राजकीय हाडवैर अखंड देशाने पाहिलं. दोघांनी एकमेकांवर मनसोक्त टीका केली. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर तर हे वैर टोकाला गेले. बाळासाहेब हे शरद पवार यांचा उल्लेख ‘मैद्याचे पोते’ असा करत तर पवार बाळासाहेबांचा उल्लेख ‘मावशी’ असा करत; पण याही पलिकडे दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही रंगतात.

‘ते’ मासिक बाजारात दिसलेच नाही…

राजकारणापलिकडे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती. ही मैत्री दाेघांनी नेहमी जपली. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एक मासिक काढायचे ठरवले. त्यावेळी टाइम या मासिकाची मोठी चर्चा होत असे. बाळासाहेब व्यंगचित्रकार आणि मार्मिक लेखनासाठी ओळखले जात होते. टाइमच्या धर्तीवर राजकीय विषयांना वाहिलेले राजनीती हे मासिक त्यांनी सुरू करायचे ठरविले.

अतिशय कष्ट घेऊन त्यांनी या मासिकाचा पहिला अंक काढला. त्यानंतर तो अंक अगदी भक्तिभावाने सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर हे दोघेही ठाकरे यांच्या बहिणीकडे गेले. त्यांची बहीणाच्‍य ‘अंगात’ येत होते. त्यांना या मासिकाचे भविष्य काय असेल असे विचारले. ‘हा अंक बाजारात दिसणार नाही’ म्हणजेच तो भरमसाठ खपेल, असे भविष्य त्‍यांनी सांगितले. शरद पवार हा किस्सा अगदी खुमासदार पद्धतीने सांगतात. ‘ठाकरे यांच्या बहिणीचे भविष्य खरे ठरले. खरंच तो अंक बाजारात दिसला नाही. कारण पुढचा अंकच निघाला नाही,’ असे मिश्किलपणे शरद पवार सांगतात.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button