सराफ व्यावसायिकाला पाथर्डीत बेदम मारहाण | पुढारी

सराफ व्यावसायिकाला पाथर्डीत बेदम मारहाण

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिकाला लोखंडी रॉड आणि गजाने बेदम मारहाण केल्याप्रकरणी दुसर्‍या सराफ व्यावसायिकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदक शहाणे (मानूरकर) असे मारहाण झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव असून, गंभीर जखमी झाल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात सराफ व्यावसायिक जय बाळासाहेब शहाणे, राज बाळासाहेब शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे, तसेच गोट्या उर्फ राहुल अशोक आव्हाड, विशाल उद्धव आव्हाड (सर्व रा. पाथर्डी) व एका अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार दिल्यास विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही आरोपींनी मोदक शहाणे यांना दिली आहे.

मोदक शहाणे हे सोमवारी (दि.21) रात्री अडीचच्या सुमारास बाहेरगावावरून पाथर्डीत चारचाकी वाहनाने आले. यावेळी दोन चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. ते खाली उतरले असता, आमचे गिर्‍हाईक का वळवितो, असे म्हणत आरोपींनी लोखंडी रॉड व गजाने मारहाण केली. मारहाणीत मोदक शहाणे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यासोबत असलेले कानिफ कराळे, गणेश चन्नेकर, आयुश मालवूनकर हे वाद सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी शहाणे यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोनसाखळी व वीस हजार रूपये आरोपी घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात; कोळगावात दुष्काळाचे सावट

dev kohli : मैंने प्यार किया, बाजीगर चित्रपटासाठी गाण्यांचे गीतकार देव कोहली यांचे निधन

कोपरगाव शहर विकासासाठी 10 कोटी निधी मंजूर : आमदार काळे

Back to top button