‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी ’, राज्यात शिक्षकांमार्फत अभियान सुरू | पुढारी

‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी ’, राज्यात शिक्षकांमार्फत अभियान सुरू

अहमनगर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची भीती आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. तसेच गुणवत्ता टिकून राहण्यासाठी राज्य सरकारने सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षकांसह पालकांनाही ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या अभियानात सहभागी व्हावे लागणार आहे. डिजिटल साधनांच्या उपलब्धतेनुसार सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा तयार करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. विशेषत: स्थलांतरीत कामगारांची मुले, विशेष गरजा असणार्‍या मुलांकडे या अंतर्गत लक्ष देण्यात येणार आहे.

‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ : शैक्षणिक संशोधन परिषदेने दिनदर्शिका

अध्ययन-अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, अध्ययनाचे स्त्रोत, अध्ययन-अनुभूतीचे स्वरुप, पालकांचा सहभाग, मूल्यमापन आणि उपचारात्मक अध्ययन, अभ्यासत्तर उपक्रमांचे नियोजन, स्थलांतरीत कामगारांची मुले, वंचित घटकांतील मुलांसाठी विशेष नियोजन, शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन सुविधा, शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष नियोजन, स्थानिक परिस्थितीनुसार विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक संशोधन परिषदेने दिनदर्शिका तयार केली आहे.

‘शाळा बंद पण शिक्षण आहे’

पहिली ते बारावीच्या सर्व विषयाची ‘दिशा’ अ‍ॅपच्या माध्यमातून ‘शाळा बंद पण शिक्षण आहे’, ही अभ्यासमाला व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. मागील वर्षातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक र्‍हास भरून काढण्यासाठी राज्यस्तरावरुन इयत्तानिहाय व विषयनिहाय सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘गुगल क्लासरुम’द्वारे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे ‘जी सूट आयडी’ तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे शैक्षणिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रत्येक शनिवार हा वाचन शनिवार

विद्यार्थ्यांची वाचन क्षमता आणि आवड वाढावी, यासाठी प्रत्येक शनिवार हा वाचन शनिवार म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दर शनिवारी विद्यार्थ्यांना श्रवणीय, बोधात्मक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापूर्वी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘प्रश्न पेढी’ आता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेत शिक्षकांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी सेतू अभ्यासक्रम पूर्ण करेल, याची खबरदारी शिक्षक व पालकांनी घ्यायची आहे. दोन तासिकांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा, अशाही सूचना दिल्या आहेत. एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही, याची खबरदारी शिक्षकांनी घ्यायची आहे. त्यासाठी शिक्षक व पालकांचे ‘सेल्प हेल्प ग्रुप’ तयार करण्यात येणार आहेत.

इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या भागात गृहभेटी देऊन चार ते पाच विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून शिकवायचे आहे. ऑनलाईनवर उपलब्ध पीडीएफ साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून दूरध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सतत संपर्क साधायचा आहे. मुख्याध्यापकांची जबाबदारी आणखी वाढविण्यात आली असून, सर्व शिक्षक १०० टक्के विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाकरिअर’

महाकरिअर पोर्टलद्वारे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५५५ कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत. २१ हजार महाविद्यालयांची संक्षिप्त माहिती तसेच १६ देशांतील १२०० शिष्यवृत्तीची माहिती बेबसाईटवर उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये या पोर्टलच्या माध्यमातून ११५० विविध प्रवेश परीक्षांबाबत माहिती दिली जाणार आहे.

तसेच राज्यातील व जिल्हानिहाय ४२६ प्रशिक्षित समुपदेशक विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक १५ मार्गदर्शन सत्रांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले असून ते यू-ट्यूब चॅनलसवर उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button