विटा : आमच्या तालमीची माती शिवली, त्यांच्यामागे आम्ही : जयंत पाटील | पुढारी

विटा : आमच्या तालमीची माती शिवली, त्यांच्यामागे आम्ही : जयंत पाटील

विटा : पुढारी वृत्तसेवा

आमच्या तालमीची माती ज्यांनी शिवली त्यांच्यामागे आम्ही कायम असतो, अशा शब्दांत पालकमंत्री जयंत पाटील यांनी खानापूर तालुक्यातील आगामी राजकीय चित्र स्पष्ट केले. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने येथे देशातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे राष्ट्रकुल कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. या कुस्ती संकुलात आखाडा पूजन आणि हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना ना. जयंत पाटील यांच्याहस्ते रविवारी झाली.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिलराव बाबर, आमदार अरुण लाड, सुभाषराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, हिंदकेसरी राम सारंग, पैलवान नामदेवराव मोहिते, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, हिंदकेसरी रोहित पटेल, हिंद केसरी संतोष वेताळ उपस्थित होते.

त्यामुळे चंद्रहार यांच्यामागे उभे राहणे माझे कर्तव्य आहे

ना. पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील राजारामबापू कारखान्याच्या तालमीच्या मातीशी जुळलेली आहेत आणि आमची माती ज्यांनी शिवली की, आम्ही त्याच्यामागे असतो. त्यामुळे चंद्रहार यांच्यामागे उभे राहणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल इथे उभे राहील.

देशाच्या नकाशावर हे उत्कृष्ट कुस्ती संकुल म्हणून नावारूपास येईल

डॉ. कदम म्हणाले, देशाच्या नकाशावर हे उत्कृष्ट कुस्ती संकुल म्हणून नावारूपास येईल. येथे अनेक नामवंत पैलवान तयार होतील.
वैभव पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वरदहस्त आहे. पण इथे बर्‍याच अडचणी आहेत. पुढचे सुद्धा बुकिंग काहींनी करून ठेवलेले आहे.

त्यामुळे तुम्ही फक्त इथलीच कुस्तीच करा. काही जण म्हणाले तशी मोठी राजकीय कुस्ती करू नका. 2034 पर्यंतचे बुकिंग भाऊंनी आधीच करून ठेवले आहे. त्यामुळे तुम्हाला तर इथे संधी नाही. आमदार बाबर म्हणाले, काही वेळेला राजकीय माणसे स्टेजवर आली की चर्चा भलतीकडेच जाते. पण माझ्यावर संस्कार आहेत. त्यामुळे मी तसे करणार नाही. पण लक्षात ठेवावे, की चंद्रहार पाटील यांनासुद्धा कुस्तीच्या आखाड्यात मीच आणले होते.

ते म्हणाले, कोणाचे बुकिंग कोणी थांबवू शकत नाही आणि कुणाचे बुकिंग कोणी वाढवूही शकत नाही. चंद्रहार पाटील जर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना मी अडवून ते अडणार नाहीत. पण काही माणसांना अशी सवय असते, की आपला विरोधक दुसर्‍याच्या पैलवानाकडून चीतपट झाला तर जास्त जोरात टाळ्या वाजवायच्या. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. राजकारणाच्या आखाड्याच्या वेळेला राजकारणाचे बघू.

युवा नेते विशाल शिंदे, विक्रमसिंह पाटील, पै. सागर सुरवसे, उद्योजक ईश्वरशेठ जाधव, उमेशशेठ काटकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर आणि अन्य कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button