पीकविमा कंपन्याकडून ९७६ कोटींऐवजी ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई 

पीकविमा कंपन्याकडून ९७६ कोटींऐवजी ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई 
Published on
Updated on

२०२०- २०२१ या खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २२ कोटी ७५ लाख ५८ हजार रुपयांच्या विमा हप्त्यापोटी ९७६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित होती. मात्र, या दोन्ही हंगामात कोणत्याच प्रकारचे पिकांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत विमा कंपनीने फक्त ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. याचा लाभ फक्त ७ हजार ४५२ बाधित शेतकर्‍यांना मिळालेला आहे.

पाऊस नसल्यास किंवा अतिवृष्टी व इतर विविध कारणांमुळे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईं मिळते. यासाठी शेतकर्‍यांनी ७२ तासांत विमा कंपनीला नुकसानीची माहिती देणे गरजेचे आहे.

२०२० – २०२१ च्या खरीप हंगामासाठी ४ लाख ६६ हजार २४५ शेतकर्‍यांनी २ लाख ५९ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी विमा हप्ता भरला होता. त्यासाठी १७ कोटी ६५ लाख ७९ हजार रुपयांचा विमा रक्कम भरुन ७४५ कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. मात्र, विमा कंपनीने नुकसानच झाले नसल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे विमा मंजूर करण्यात आलेला नाही.

स्थानिक आपत्ती हा निकष लावून ७ हजार ३९४ शेतकर्‍यांसाठी ५ कोटी ३६ लाख २ हजार रुपये व पीक काढणी पश्चात विमा संरक्षणअंतर्गत ५८ शेतकर्‍यांना ८ लाख ४९ हजार रुपये विमा रक्कम मंजूर केलेली आहे. २०२०-२०२१ याच वर्षातील रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत १ लाख १९ हजार ५२१ शेतकर्‍यांनी ६५ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रासाठी ५ कोटी ९ लाख ७९ हजार रुपयांचा विमा हप्ता भरुन २३१ कोटी ४२ लाख ११ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती.

अशा पध्दतीने एकूण २२ कोटी ७५ लाख ५८ हजार रकमेच्या विमा हप्त्यापोटी ५ लाख ८५ हजार ७६६ शेतकर्‍यांना ९७६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित होती. मात्र विमा कंपनीने ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांवरच बाधित शेतकर्‍यांची बोळवण केली आहे. खरीप हंगामातील विमा रक्कम शेतकर्‍यांना उपलब्ध व्हावी, यासाठी विविध संघटनांनी आंदोलने केली. मात्र, अद्याप ही विमा रक्कम बाधित शेतकर्‍यांना मिळालेली नाही.

यंदा ११ कोटी ७८ लाखांचा विमा हप्ता

२०२०१-२२ या वर्षाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी २ लाख ८७ हजार ९६ शेतकर्‍यांनी १ लाख ५८ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यासाठी ११ कोटी ७८ लाख ९६ हजार रुपयांचा विमा हप्ता भरुन ४७६ कोटी १६ लाख ८३ हजार रुपयांची विमा संरक्षित केला आहे. गेल्या वर्षीचा विमा आज ना उद्या मिळेल, या आशेवर शेतकर्‍यांनी यंदादेखील पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.

आतापर्यंत तोकडीच रक्कम

२०१४- १५ या वर्षात राष्ट्रीय पीकविमा योजनेतून दोन्ही हंगामासाठी ५३ हजार ६०० शेतकर्‍यांना २२ कोटी ७ लाख रुपये विम्यापोटी मंजूर झालेले आहेत. २०१५-१६ साठी २ लाख ६९ हजार ७२५ शेतकर्‍यांसाठी १२० कोटी ६२ लाख ४६ हजार रुपये मंजूर झाले. २०१६-१७ मध्ये १ लाख ६ हजार ४१४ शेतकर्‍यांना ८३ कोटी २३ लाख रुपये मंजूर झाले.

२०१७-१८ मध्ये ४२ हजार ३९९ शेतकर्‍यांना २० कोटी ८७ हजार रुपये तर २०१८-१९ या वर्षात २ लाख ३६ हजार ७८५ शेतकर्‍यांना 148 कोटी २ लाख ४९ हजार रुपये विमा रक्कम उपलब्ध झाला आहे. २०१९-२० या वर्षात ५ लाख २१३ शेतकर्‍यांना ३०७ कोटी ८७ लाख रुपये विमा नुकसान उपलब्ध झालेले आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news