जागतिक चिमणी दिन विशेष : ‘परत फिरा रे…’ला चिमण्यांची साथ | पुढारी

जागतिक चिमणी दिन विशेष : ‘परत फिरा रे...’ला चिमण्यांची साथ

नगर; पुढारी वृत्तसेवा : चिमण्यांची संख्या मागील दोन वर्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याचे निसर्गप्रेमी व संवर्धन समूहाच्या अभ्यासकांंना दिसून आली आहे. त्यांच्या मते हे प्रमाण अत्यल्प जरी असले, तरी सकारात्मक आहे. त्यांच्या ‘परत फिरा रे..!’ या अभियानाला चिमण्यांनी साथ दिली असेच म्हणावे लागेल. अर्थातच निसर्ग अभ्यासकांचा मोठा हातभार आहे.

हाऊस स्पॅरो अर्थात चिमणी केवळ मानवी सहवासातच राहू शकणारा पक्षी. पण, सातत्याने घटत जाणारी त्यांची संख्या लक्षात घेता ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त त्यावर विचारमंथन व उपाययोजनात्मक कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे. निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहातर्फे पक्षीप्रजाती व त्यांच्या संख्येवर जिल्हाव्यापी अभ्यास ‘पक्षी गणना’ उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षांपासून केला जाते. त्यांच्या टीमने केलेल्या सातत्यपूर्वक निरीक्षण नोंदींवरून चिमण्यांच्या सरासरी प्रमाणात दरवर्षी चिंताजनक घट झाल्याचे दिसून आली. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या समूहातर्फे जिल्हाभरात चिमणीसंवर्धन उपक्रम हाती घेतला गेला. त्यांच्यामार्फत जिल्हाभरात दरवर्षी अल्पदरात शेकडो कृत्रिम घरटी व बर्ड फिडर पुरवले जातात. जागृक व निसर्गप्रेमी नागरिक, असे बर्ड फिडर आपल्या अंगणात, बागेत, अगर परिसरात बसवून चिमणी संवर्धनास हातभार लावत आहेत.

या उपक्रमातून चिमण्यांच्या संख्येत सकारात्मक वाढ झाल्याचेही दिसून आले. चिमण्यांच्या घटत चाललेल्या संख्येवर प्रत्येक निसर्गप्रेमीने आपला खारीचा वाटा उचलणे गरजेचे असल्याने अंगणात, परिसरात बर्ड फिडर व कृत्रिम घरटे बसवण्याचे आवाहन निसर्गप्रेमी समूहातर्फे करण्यात आले.

पक्षी अन्नसाखळीत प्राथमिक स्तरावर

चिमणी व तत्सम धान्य व कीड खाण्यारे व थव्याने राहणारे पक्षी. अन्नसाखळीत प्राथमिक स्तरावर येतात. इतरांच्या तुलनेत त्यांची संख्या जास्त असते. त्यानंतर त्यावर जगणारे शिकारी पशु-पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या क्रमाक्रमाने कमी होत जाते. पक्षी जीवनावरच कीटकजीवन, वनस्पतीजीवन व परिणामी प्राणीजीवन निगडित असते, म्हणून पक्षीजीवन ही निसर्ग संतुलनातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पत्तक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे. त्यातही चिमणी हा पक्षी शेतीपिकांसाठी नैसर्गिक कीडनाशकाचे कार्य करणारा असल्याने अधिक महत्त्वाचा आहे.

Back to top button