पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा, निलेश लंकेंचा खुलासा | पुढारी

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा, निलेश लंकेंचा खुलासा

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण सारखा मार्ग का स्वीकारू असा सवाल उपस्थित केला आहे. पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या या क्लीपमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली  आहे. वरिष्ठ पातळीवर देखील याची दखल घेतली गेली आहे.

दुसरीकडे आमदार निलेश लंके यांनी खुलासा देत तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहे त्यातून बचाव करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आवाजातील व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन केले आहे.

शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली.

मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात, याबाबत त्यांनी या क्लिपमध्ये आरोप केले आहेत.

आपल्या विरुद्ध विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीचालकाकडून लिहून घेणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे, असे अनेक प्रकार घडले आहेत, असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

याबाबतचे कथन करताना त्या अनेकदा रडतही आहेत.

ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर तालुक्यासह राज्यभर खळबळ उडाली असून यासंदर्भात तालुक्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

बचाव करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयोग

आठ दिवसापूर्वी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. नाशिक विभागीय आयुक्त गमे यांनी तसा अहवाल मुंबई ला पाठवला आहे.

यापूर्वीही बरेच प्रयोग त्यांनी केले आहेत. कामात गलथान कारभार, भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या त्यावेळी मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी रात्री अपरात्री मेसेज करून सांगितले की जर तुम्ही या गोष्टी उघड केल्या तर मी आत्महत्या करेन. असे आतापर्यंत बरेच प्रकार झाले आहेत.

ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागातील अधिकाऱ्यांनाही त्या दोषी धरतात.

तुम्ही साधुसंत सारखे काम करता आणि बाकीचे चुकीचे काम करतात असे दाखवण्याचा प्रयोग केला जातो.

त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत ती सखोलपणे चौकशी सुद्धा चालू आहे. त्यातून बचाव करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयोग आहे.

– आमदार निलेश लंके

ही क्लिप देवरे यांचीच : जिल्हाधिकारी

सदरची क्लिप ही पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचीच असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

देवरे यांनी या संदर्भात आठ दिवसांपूर्वी तक्रार केली असून त्याची महिला आयोगामार्फत चौकशी सुरू आहे.

या क्लिपवर काय धोरण घ्यायचे, हे प्रशासनाने अद्याप ठरवले नसल्याचे डॉ.भोसले म्हणाले.

हे ही वाचलं का?

Back to top button