नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सीएम ठाकरे : कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासाच्या कामाच्या आड कोणालाही येऊ देणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाही उद्धव ठाकरे यांनी मेट्रो फ्रिडम पार्क स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना दिली.
सीएम ठाकरे व्हिडीओ लिंकद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणाच्या सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींनी त्यांना लिहीलेल्या पत्राचा उल्लेख केला. 'नितीनजी तुम्ही गोष्टी खूप प्रेमळ करता. पण पत्र खूप कडक लिहिता' असा उल्लेख करीत विकासाच्या आड कोणाला येऊ देणार नाही, अशी ग्वाही सीएम ठाकरे यांनी दिली.
आपण दोघेही कर्तव्य कठोर आहोत. शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की जनतेशी कधीही विश्वासघात व गद्दारी करायची नाही. जनतेच्या कामात कुठलाही अडथळा येऊ द्यायचा नाही. हीच शिकवण तुम्ही आणि आम्ही घेतली आहे.
नागपूर उपराजधानी म्हटल्यानंतर जगातील सर्वोत्तम शहरात त्याची गणना व्हावी यासाठी आमचेही प्रयत्न आहेत. माणसे जाेडताना राजकीय जोडे बाहेर काढून येतो, हीच आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. विकासाच्या मार्गात कारभाराचे स्पीड ब्रेकर येऊ देत नाही. प्रगती आणि विकास जलद गतीने साधण्यासाठी मार्ग आणि महामार्गाचे जाळे विणत आहोत. त्यात उणीवा वा त्रूटी राहू नयेत. प्रत्येक पावलावरती प्रत्येक क्षणी आपण सोबत आहोत, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.