

राहुरी : रियाज देशमुख : राहुरी नगरपरिषदेच्या आरक्षणाची सोडत सोमवारी जाहीर झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती, जमाती, महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत झाल्यानंतर इच्छुकांच्या मनातील फुललेल्या पाकळ्या आरक्षणाच्या गोत्यात अडकल्याचे दिसून आले. नेमके कोणत्या प्रभागात सोयीची उमेदवारी ठरावी, यासाठी राजकीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांचे खलबते सुरू झाले आहेत. काही मातब्बर राजकीय नेत्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आरक्षित जागा असल्याने संबंधितांना इतरत्र उमेदवारीसाठी चाचपणी करावी लागणार आहे.
राहुरी नगरपरिषदेच्या राजकीय सारिपाटामध्ये तनपुरे गटाची ताकद वाढली आहे. दुसरीकडे विधानसभेत भाजपने वर्चस्व गमावल्यानंतर पहिलीच मोठी निवडणूक असल्याने भाजप आपले अस्तित्व दाखविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार, हे तेवढेच खरे. जिल्ह्यात मध्यवर्ती असलेल्या राहुरी नगर परिषदेची सत्ता तालुक्यातील सत्तेची चावी असते. त्यामुळे पालिका निवडणुकीला महत्त्व आहे. तनपुरे गटाच्या ताब्यात पालिकेची सत्ता अनेक वर्षांपासून अबाधित आहे. ही सत्ता हिरावण्यासाठी विरोधी विखे-कर्डिले गटाची रणनिती यंदा कितपत यशस्वी होणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
नगरपरिषदेच्या पेटलेल्या रणांगणाला आरक्षण सोडतीनंतर फोडणी मिळाली आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी तनपुरे गट हा राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोठी रणनिती आखत आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खा. प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये तरुणांची फळी मैदानात उतरणार आहे. अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे यांची उमेदवारी यंदा तनपुरे गटाकडून चर्चेची ठरत आहे. ते 1, 5 किंवा 9 या प्रभागातून उमेदवारी करतील, अशी चर्चा आहे. रावसाहेब चाचा तनपुरे यांचे चि. प्रतीक तनपुरे यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे. विरोधी गटाचे नेतृत्व खा. डॉ. सुजय विखे पा. व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब चाचा तनपुरे, दादा पाटील सोनवणे, राजेंद्र उंडे, अण्णासाहेब शेटे हे नेतृत्व करणार आहेत.
खा. डॉ. विखे व कर्डिले यांची नेमकी भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. सत्ताधारी तनपुरे गटाकडे इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागत आहेत. गेल्या निवडणुकीत विरोधी गटाकडून नगरसेवक झालेले शहाजी जाधव ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत मंत्री तनपुरे यांच्या हस्ते हातात घड्याळ बांधले. विरोधी गटाचे आणखी नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तनपुरे गटाच्या वाढत्या ताकदीला लगाम लावण्यासाठी खा. डॉ. विखे व माजी आ. कर्डिले यांची खेळी निर्णायक ठरणार आहे. तनपुरे गट राष्ट्रवादी पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक लढविणार हे निश्चित, परंतु विरोधी गट अजूनही परिवर्तन मंडळ की भाजप, याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी निर्मळ, प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढत सोडत जाहीर केली. पूर्वीच्या 21 नगरसेवकांच्या जागांमध्ये 3 ने वाढ झाली. प्रत्येक प्रभागात 2 नगरसेवक असतील. 12 प्रभागांची आरक्षण रचना स्पष्ट झाली. या आरक्षणावर 15 ते 21 जूनपर्यंत हरकत नोंदवावी. 24 जून रोजी आरक्षण व सोडतीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास देणार आहे, असे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर म्हणाले.
प्रभाग1 (येवले आखाडा)-अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग 2 (खळवाडी)अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण, प्रभाग 3 (तनपुरेवाडी) अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. 4 (बुसासिंदबाबा चौक) अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 5 (तुळजा भवानी) अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. 6 (ज्ञानेश्वर थिएटर) अ-सर्वसाधारण महिला ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. 7 गोकूूळ कॉलनी, लक्ष्मीनगर) अ-अनुसूचित जाती महिला ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. 8 (बिरोबानगर) , अ-अनुसूचित जमाती ब-सर्वसाधारण , प्रभाग क्र. 9 (जोगेश्वरी आखाडा), अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. 10 (वराळे व सरोदे वस्ती)अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. 11 (इंगळे इस्टेट) अ-अनुसूचित जमाती महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र. 12 (राजवाडा) अ-अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण.