

नगर : पुढारी वृत्तसेवा
सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. याचबरोबर सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी लागणार्या निधीसाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देत, यासाठी लगेच निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
नगर शहरातून वाहत असलेल्या सीनानदीचे कार्यक्षेत्र सुमारे 14 किलोमीटर असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून ही नदी वाहते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सीना नदीच्या पूर रेषेची हद्द सुमारे 500 मीटरच्या दरम्यान आहे. त्यामुळे सीन नदीलगत राहणार्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी मिळत नाही.
या अशा नियमामुळे सुमारे शहरातील 50 टक्के नागरिकांना या पूर नियंत्रण रेषेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आ.संग्राम जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला.त्यामुळे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनात 25 मे रोजी ही पूर नियंत्रण रेषा शिथिल करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ.जगताप तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ.जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर दौर्यावर आले असता, त्यांनी प्रत्यक्ष सीनानदी पूर नियंत्रण रेषेची घटनास्थळी जाऊन पाहणी केली.