बाटली आडवीच..महिलांचा पुन्हा विजय; निघोजमध्ये दारुबंदीचा निर्णय कायदेशीरच!

बाटली आडवीच..महिलांचा पुन्हा विजय; निघोजमध्ये दारुबंदीचा निर्णय कायदेशीरच!
Published on
Updated on

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील निघोज येथे सहा वर्षांपूर्वी झालेली दारुबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. निघोज येथे महिलांच्या ऐतिहासिक लढ्यानंतर मतदानातून बहुमताने दारुबंदी करण्यात आली होती. त्यानंतर येथील सात परवानाधारक दारू दुकाने जिल्हाधिकारी यांनी बंद केली होती. पुढे दोन वर्षांनंतर दारुविक्रेत्यांनी येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना हाताशी धरून गावात दारूबंदी उठवणारा बोगस ठराव घेवून दारू दुकाने पुन्हा चालू केली होती.

पुन्हा दारू दुकाने सुरू झाल्यानंतर येथील दारूबंदी होण्यासाठी पुढाकार घेणार्‍या लोकजागृती सामाजिक संस्थेच्या विश्वस्त कांता लंके यांनी जिल्हाधिकार्यांच्या दारूबंदी हटवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप मुंबई यांच्याकडे आव्हान दिले होते. राज्य आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांचा दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवून स्थगिती दिली.

त्यामुळे पुन्हा एकदा निघोज येथील परवानाधारक दारू दुकाने बंद करण्याचे आदेश निघाले. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निघोजला पुन्हा दारूबंदी जाहीर केल्याच्या निर्णयाला येथील दारू विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देवून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर घेण्यात आली.

न्यायालयाने यावेळी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी निघोजला पुन्हा दारूबंदी केल्याचा निर्णय योग्य असण्यावर शिक्कामोर्तब करून याचिकाकर्त्याला राज्य सरकारकडे याविषयी दाद मागण्याची मुभा ठेवली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी निघोजला पुन्हा दारूबंदीचा घेतलेला निर्णय योग्य असून त्यात हायकोर्ट हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे म्हणत दारूविक्रेत्यांची याचिका निकाली काढली.याबाबतची याचिका दारूविक्रेत्यांच्या वतीने विष्णू श्रीहरी लाळगे यांनी दाखल केली होती.

निघोज येथील दारुबंदीसाठी ऐतिहासिक लढा देणार्‍या महिलांचा उच्च न्यायालयाच्या योग्य निर्णयामुळे पुन्हा एकदा विजय झाला आहे. येथे आता कायदेशीर दारुबंदी झाली आहे; तरी आता यापुढे येथील बेकायदेशीर दारू विक्रीला राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी आळा घालावा अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करू
                                – कांता लंके, विश्वस्त, लोक जागृती सामाजिक संस्था, निघोज

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news