NCP MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरण : राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच : विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा निर्वाळा | पुढारी

NCP MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरण : राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच : विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा निर्वाळा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या ५३ पैकी ४१ आमदार हे अजित पवार गटाकडे होते. या गटाकडे असलेले बहुमत शरद पवार गटाने देखील नाकरालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचाच  आहे, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि. १५) आमदार अपात्रता प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी दिला. तसेच अजित पवार व शरद पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. ( NCP MLA Disqualification Case)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरील निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि.१५) दिला. निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार गटाला मूळ पक्ष ठरवत चिन्ह बहाल केले. त्यानंतर आमदार अपात्रतेविषयी निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनीही राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्‍याचे स्‍पष्‍ट करत शरद पवार गटाच्‍या तिन्‍ही याचिकाही त्‍यांनी फेटाळल्‍या. ( NCP MLA Disqualification Case)

NCP MLA Disqualification Case: पक्षांतर असहमती म्‍हणजे कायदेभंग नव्‍हे

शरद पवारांच्‍या मनाविराेधात निर्णय घेणे म्‍हणजे पक्ष साेडणे नव्‍हे. पक्षांतर असहमती म्‍हणजे कायदेभंग नव्‍हे, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. पक्षातील नाराजी म्‍हणजे विधिमंडळ पक्षाची नाराजी नाही, असेही नार्वेकर यांनी स्‍पष्‍ट केले. पक्षांतर बंदी कायद्‍यातील १० सूची म्‍हणजे पक्ष चालविण्‍याचे शस्‍त्र नाही. याचा उपयाेग आमदारांना शिक्षा करण्‍यासाठी करु नये, असे निरीक्षणही नार्वेकरांनी नाेंदवले.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे ठरविण्याचा अधिकार माझा नाही

प्रथम शरद पवार गटाच्या बाजूने सुनावणी झाली. यामध्ये अध्यक्ष नियमानुसार ‘आपलाच’ आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून करण्यात आला. त्या संदर्भातील पुरावेही सादर करण्यात आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे ठरविण्याचा अधिकार माझा नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.

विधिमंडळात बहुमताच्‍या आधारावर पक्ष अजित पवारांचा

विधिमंडळात पक्षाला बहुमत कुणाचे हा एकमेव निकषच महत्त्वाचा ठरतो.  पक्ष कोणाचा हे ठरवताना तीन गोष्टींचा विचार केला जातो. पहिला सुप्रीम कोर्टाच्या  आदेश , सचिवालयातील कागदपत्रे आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सादर करण्यात आलेले पुराव्यांचा विचार केला जातो. पक्षाध्‍यक्ष ठरवताना पक्षाचा घटनेचा नाही तर बहुमताचा विचार हाेताे. आमदारांची भूमिका हा पक्षांतर्गत विषय आहे.  विधिमंडळ बहुमताच्‍या आधारावर राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, असे निरीक्षणही नार्वेकरांनी नाेंदवले.

३१ जानेवारीला संपले हाेते ‘आमदार अपात्रता’ सुनावणीचे कामकाज

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. (NCP MLA Disqualification Case)

केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता. या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहातून नार्वेकर काय निकाल देणार, याबाबत उत्सुकता होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस’ अजित पवारांचीच असल्याचे नार्वेकरांनी निकाल देताना म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांच्या कोणत्याच आमदाराचे निलंबन केले नव्हते. एकनाथ शिंदेकडे पक्ष असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिला. मात्र, शिंदेंचे प्रतोद भरत गोगावले यांनी योग्य पद्धतीने व्हिप बजावला नसल्याचे सांगत ठाकरे गटाला निलंबित करण्याचे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालात कोणालाही निलंबित न करण्याचे धोरण कायम ठेवले जाणार की वेगळा निर्णय होणार, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या सुनावणीत व्हिपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या आमदारांवर टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button