मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ येथे मराठा समाजाच्या वतीने मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गावर 'मराठा आरक्षणासाठी' रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनात मोहोळ शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या श्रीराम मंगल कार्यालयामध्ये आज विवाह सोहळा असलेले नवरदेव व नवरी यांनी सहभाग घेतला.एवढेच नव्हे तर नवरा-नवरीसह वऱ्हाडाने देखील या आंदोलनात सहभाग घेतला.
यामध्ये मराठा समाजास राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही.सगेसोयरे याचाही अध्यादेश शासनाने काढलेला नाही. मराठा समाजास ओबीसीतूनच आरक्षण मिळावे असे नवरदेवाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजासाठी 10 % आरक्षण जाहीर करण्यात आले. परंतु मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली नसल्याने मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुचनेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
त्यानुसार मोहोळ येथे रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आज मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गावर सुरु असलेल्या मराठा समाजाच्या रास्ता रोकोमध्येज्ञशहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या श्रीराम मंगल कार्यालयामध्ये आज विवाह असणाऱ्या जोडप्याने देखील सहभाग घेतला. नवरदेव प्रमोद विलास टेकळे (रा. पापरी) आणि प्रियांका अर्जुन मुळे (रा. ढोकबाभुळगाव) हे नवरा नवरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्याबरोबर संपूर्ण वऱ्हाडच रस्त्यावर उतरून आंदोलनामध्ये सहभागी झाले.
त्यामुळे मोहोळचा हा रस्ता रोको आंदोलन व व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.