पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय बारसकारांच्या मागे एक मंत्री आहे. बारसकर महाराजाला विकत घेतलं गेलं आहे. हा मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रवक्त्याचा ट्रॅप आहे, असा आराेप करत तुला माझ्यावर काय आरोप करायचे आहेत ते कर; पण माझ्या कुटुंबावर आणि तुकाराम महाराज यांच्यावर आरोप करायचे नाहीच. बारसकरांचे अनेक गुन्हे केले आहेत. महाराज नाव लावून घ्यायला खूप नियत करावे लागते. महाराज नावाला कशाला डाग लावतो?, अशी घणाघाती टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज केली.
उपोषण काळात बारस्कर यांनी मला पाणी पिण्याचा आग्रह केला होता. मला पाणी पाजून त्यांना मोठे व्हायचे होते. मात्र, तेव्हाच मी त्यांना तेथून हाकलून लावले. त्या संतापातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. हे षड्यंत्रही त्यातूनच सुरू झाले आहे, असेही जरांगे म्हणाले."
"जगद्गुरू तुकाराम महारांजाच्या आडून बोलू नकोस. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि वारकरी समाजाची बदनामी करु नकोस. मी वारकरी संप्रदायाला मानतो. गेले १० वर्षे कुठे होतास. वारकरी संप्रदायाला वाईट-साईट लोक बोलले तेव्हा तु कुठे होतास. तु माझ्या कुटूंबियाचही नाव घेवू नको. तुला कुटूंब म्हणजे काय कळणार. हा कसला महाराज आहे. तो तर बावळटकर आहे. त्यांच्या मागे कोणते नेते, मंत्री आहेत. हे मला माहीत आहे. त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. समाजाचे हित माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. मी हेकेखोर नसून समाजासाठी कट्टर आहे; मात्र तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करू नये." असेही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे कायम पलटी मारतात आणि खोटे बोलतात, असा आरोप करत जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य असलेले अजय बारस्कर महाराज यांनी जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी (दि.२) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. मधल्या काळामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जी घटना घडली, त्यानंतर मी आंदोलनाच्या या लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदणीसाठी मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळेच मी जरांगे यांच्यासोबत सहभागी झालो होतो. यापूर्वी कधीच मी माध्यमांसमोर आलो नाही. जरांगे अत्यंत हेकेखोर माणूस असून, ते कायम पलटी मारतात. एवढेच नव्हे, तर सतत खोटे बोलतात, अशा आरोपांच्या फैरी बारस्कर यांनी झाडल्या.
जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून खदखद होती. ती मी व्यक्त करत आहे. यामुळे मला गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही. जरांगे यांनी रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकार्यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. त्याचाही मी साक्षीदार आहे. लोणावळा, वाशी येथेही मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या. अशा गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता. या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे असल्याचा दावादेखील बारस्कर महाराज यांनी केला आहे.