

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढतच आहेत. या प्रकरणी मलिक हे दररोज एक गौप्यस्फोट करीत आहे. मलिकांना यामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले. आता त्यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिकांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते.
या वेळी शरद पवार म्हणाले की, "जिथे अधिकारांचा गैरवापर होत आहे, अशी बाब उघड करण्याचे काम नवाब मलिक करीत आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन केंद्र सरकारने संबंधितांवर त्वरीत कारवाई करायला हवी, ही त्यांची जबाबदारी आहे",
काल मुंबईत भाजपच्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात ठराव मांडला होता. या ठरावाची शरद पवारांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, "वर्तमानपत्रामध्ये हे वाचलं आणि एक विनोद वाचल्याचा आनंद झाला", असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला.
गेली महिनाभरापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात समीर वानखेडे यांच्या संदर्भात नवाब मलिकांनी वेगवेगळे गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या धर्म, विवाह, आणि जात प्रमाणपत्रावरुन विविध गौप्यस्फोट केले. यानंतर वानखेडे कुटुंबियांनीही पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवाब मलिक ड्रग्ज प्रकरणावरून समीर वानखेडेंवर आरोप करणे सुरुच ठेवले. आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी नवाब मलिकांच्या या कृतीचे समर्थन केले आहे.