Nanded hospital death | पीएम मोदींचा स्वच्छतेचा संदेश, म्हणून शौचालय साफ केलं, हेमंत पाटील यांचे स्पष्टीकरण | पुढारी

Nanded hospital death | पीएम मोदींचा स्वच्छतेचा संदेश, म्हणून शौचालय साफ केलं, हेमंत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गेल्या काही दिवसांतील मृतांचा आकडा ४१ वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील मंगळवारी (दि.३) रोजी दुपारी रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला सांगितले. त्यानंतर वाकोडे यांना अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी त्यांच्यावर अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हेमंत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना, “हे १०० टक्के राजकारण” असल्याचे म्हटले आहे. (Nanded hospital death)

संबंधित बातम्या – 

मी शौचालय साफ केलं : हेमंत पाटील

अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी या प्रकरणाबाबत खुलासा केला. यावेळी ते म्हणाले की,”लोकप्रतिनिधी, लोकसेवक म्हणून अधिष्ठाता यांना भेटायला गेलो. त्यांना विचारलं कसं काय झालं. त्यांच शौचालय पाहिलं. तिथे दुर्गंधी होती. घाण साचली होती तर एक शौचालय कुलूप लावलेलं होतं. मी त्यांना म्हणालो काल गांधी जयंती झाली, काल देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण दोघे मिळून हे शौचालय साफ करु. आणि मी स्वत: पाणी टाकून शौचालय साफ केलं. या दरम्यान त्यांना मी कुठेही आरेतुरे केलं नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही. जात विचारण्याचा प्रश्नच येत नाही. मी माणूस केंद्रबिंदू मानून आयुष्यात गेले ४० वर्षे राजकारण करत आलो आहे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या जर अधिकाऱ्यांना एक लोकप्रतिनीधी या नात्याने प्रश्न विचारल्यानंतर जर अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असेल तर ही गंभीर बाब आहे.”

पुढे बोलत असताना पाटील म्हणाले की,” ज्या ३६ बालकांचा मृत्यू झाला त्याच्या संदर्भात कुठेही चर्चा होत नाही, कोणतीही संघटना आंदोलन करत नाही. परंतु एका अधिष्ठ्याला आणि त्यांचचं शौचालय साफ करायला लावलं म्हणून अॕट्रॉसिटी गुन्हा दाखल होतोय ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याच्यामध्ये १०० टक्के राजकारण आहे. रात्री ३ वाजता जर देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल होत असेल आणि खोट्या केसेस दाखल होत असतील तर निश्चित यात राजकारण आहे. जर मी शिवीगाळ, जातीवाचक बोललो असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी त्याच्याबद्दल मागे हटणार नाही. पण जर मी चुकीचे काही केले नसेल आणि गुन्हा दाखल होत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे.” (Nanded hospital death)

Nanded hospital death : काय आहे प्रकरण?

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खासदार हेमंत पाटील मंगळवारी (दि.३) गेले होते. तेथे अधिष्ठातांच्या दालनात जाऊन त्यांनी अधिष्ठाता व अन्य डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. तसेच अधिष्ठाता व एका डॉक्टरला शौचालयाची सफाई करावयास लावली. शौचालयाची सफाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर संमिश्र पडसाद उमटले.

या प्रकरणानंतर खासदार हेमंत पाटील यांच्यावर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत वाकोडे यांनी स्वतः पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शौचालय साफ करण्यासाठी आपणास धमकावले तसेच व्हिडिओ काढून बदनामी केली. शासकीय कामात अडथळा आणला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पाटील यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button