पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे खोदणार असून, तळापर्यंत तपास केला जाणार आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फरार आरोपी ललित पाटील याचा कसून शोध घेतला जातो आहे. गार्ड कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. पाटीलच्या शोधासाठी पोलिसांची पथके राज्यभर फिरत आहेत. लवकरच त्याला अटक होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी बुधवारी 'दैनिक पुढारी'ला बोलताना दिली.
ससून रुग्णालयातून ड्रग्जमाफिया ललित पाटील फरार झाल्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी रुग्णालयात बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या एका अधिकाऱ्यासह नऊ जणांना मंगळवारी निलंबित केले. रुग्णालयातून चालणाऱ्या या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती प्रचंड असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
ससून रुग्णालयाच्या गेटवरच तीन दिवसांपूर्वी दोन कोटींच्या मॅफेड्रॉन या अमलीपदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील मुख्य आरोपी पाटील हा रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवित होता. ललितचा भाऊ आणि रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील एकजण त्याला मदत करीत होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी पाटील हा रुग्णालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाला.
आरोपी पाटील हा रुग्णालयात टी.बी, हर्नियावर उपचार घेत असल्याचे जेल प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, मागील चार महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. या कालावधीत त्याचे ऑपरेशन झाले नाही. परंतु पोलिसांनी ड्रग्ज पकडल्याची कारवाई केल्यानंतर तत्काळ दुसऱ्याच दिवशी त्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले. या सर्व प्रकरणात रुग्णालयातील अधिकाऱ्यांची भूमिका आक्षेपार्ह वाटत असल्याचेही आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
याशिवाय आरोपींवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वाॅर्ड क्रमांक 16 आहे. याठिकाणी गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे महिनोमहिने मुक्काम ठोकत आहेत. अनेक आरोपी हे किरकोळ आजारासाठी येथे थांबत असून, हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. यातच पाटील रुग्णालयात मोबाईलचा वापर करत होता. येथूनच त्याने पळ काढल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे. प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलिस आयुक्तांनी यांची गंभीर दखल घेतली आहे.
रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविणारा आरोपी पाटील पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासनावरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यातच वॉर्ड क्रमांक 16 मध्ये आरोपी मुक्काम ठोकत असून, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून बोलण्यास नकार दिला जात आहे.
आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल असताना, ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्यासाठी ससून रुग्णालयात धडक दिली. त्या वेळी पथकाला ससून रुग्णालय प्रशासनाने कारागृह आणि न्यायालयीनविषय असल्याचे सांगत रोखल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पथकाने सापळा लावून ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ कारवाई करत अमलीपदार्थ जप्त केले. त्यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाने अशी भूमिका का घेतली, याबाबतदेखील अनेक सवाल उपस्थित होत आहेत. पाटील हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी आहे हे माहिती असतानासुद्धा त्याचे हार्नियाचे ऑपरेशन करण्याची तयारी लगेच केली जाते हादेखील एक मोठा सवाल असल्याचे बोलले जाते आहे.
पोलिसांच्या ताब्यात असताना ससून रुग्णालयातून ललित पाटील याने काढलेला पळ अनेक प्रकारचे सवाल उपस्थित करतो. त्या वेळी कर्तव्यावर असलेले पोलिस गार्डचे वर्तन, त्यांनी चौकशीदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली माहिती, पाटील पळाल्याचे वरिष्ठांना उशिरा कळविले या सर्व बाबी नाही म्हटले तरी अनेक प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी या सर्व बाबी गृहीत धरून पाटील हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पळाला की त्याला कोणी पळून जाण्यास मदत केली. याचाही तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ससून रुग्णालयापासून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाटीलच्या फेऱ्या यापूर्वी झाल्याची माहिती आहे. तेथे एक खोली बुक करण्यात येत होती. तो त्याच्या काही लोकांना तेथे भेटत होता. त्यामुळे पाटील याच्यावर एवढी मेहरबानीची खैरात कोण करत होते याचादेखील शोध घेणे गरजेचे आहे. पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर हेच हॉटेल गाठले होते. त्यामुळे तो इतरत्र न पळता त्या हॉटेलमध्ये कशाला गेला हेसुद्धा संशयास्पद आहे.
हेही वाचा