पुणे : सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरुवातीला 144 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता होती. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयातील पायाभूत सुविधांची वाढ मात्र संथ गतीने होत आहे. त्यामुळे ससून रुग्णालयावर रुग्णसेवेचा असह्य ताण निर्माण झाला आहे. परिस्थितीशी दोन हात करीत असतानाच 'अर्थ'पूर्ण संबंधांची पाळेमुळेही रुजताना दिसत आहेत.
सध्या ससून रुग्णालयामध्ये 1500 खाटांची क्षमता आहे. खाटांच्या तुलनेत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र जास्त आहे. दररोज किमान 2 हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी येतात. दररोजच्या आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्या दीड हजार असते. डॉक्टरांसह वर्ग तीन आणि चारच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांवर कमालीचा ताण निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधूनही गरीब आणि गरजू रुग्ण उपचारांसाठी येतात. एकीकडे खासगी आरोग्यसेवा महागडी झालेली असताना ससून रुग्णालयात मोफत उपचार मिळतील, अशी रुग्णांची अपेक्षा असते. मात्र, रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा वेगाने वाढत नसल्याने उपचारांमध्ये दिरंगाई होत आहे.
ससूनमधील डॉक्टरांनी हृदयरोगावरील उपचारांसाठी पैशांची मागणी करणे, मेडिकल बिले मंजूर करण्यासाठी हात ओले करण्याची मागणी करण्यापासून कैद्यांशीही 'अर्थ'पूर्ण संबंध निर्माण होत असल्याचे आणि त्यातून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याची अनेक प्रकरणे आजवर समोर आली आहेत.
हेही वाचा