

सातारा पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत यंदा बेस्ट परफॉर्मन्स बँक जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण सोमवारी ऑनलाईन पध्दतीने झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह प्रशासनाने हा पुरस्कार स्विकारला.
देशातील राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नियंत्रक म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कामकाज करते. या बँकेच्यावतीने देशात उत्कृष्ट कामकाज केलेल्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो. यंदा नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनीच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे बँकेस उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पध्दतीने केंद्रीय कृषीमंत्री ना. नरेंद्र तोमर यांच्या हस्ते अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना केले.
जिल्हा बँकेने ३ लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने, बँक पातळीवर १०० टक्के वसुली करणर्या संस्थांना प्रोत्साहन भत्ता, संस्था पातळीवर वसुली करणार्या संस्थांना गौरवनिधी आदी उपक्रम राबवले आहेत. गेल्या ११ वर्षांपासून या उपक्रमांवर बँकेने कोट्यवधी रूपये सोसायट्यांना दिले आहेत. यामुळे सोसायट्या सक्षम होण्यास मदत झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही बँकेने देशात ९७ टक्के इतकी सर्वोच्च वसुली केली आहे. त्याच बरोबर ९५४ संस्थांपैकी ८५७ संस्थांची बँक पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली झाली आहे. तर ८५० संस्था या नफ्यात आहेत. बँकेने ७ दशकाच्या वाटसालीमध्ये वसुली व नफ्यामध्ये सातत्य ठेवून विक्रम प्रस्थापित केलेला आहे.
बँकेच्या या कामगिरीचा आढावा घेवूनच पुन्हा एकदा नाबार्डने बँकेचा बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून गौरव केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संचालकांनी अभिनंदन केले.