

कर्जत : पुढारी वृत्तसेवा
कर्जत पोलिसांच्या अॅक्शन मोडची सध्या चर्चा आहे त्याला कारणही तसेच आहे. कर्जत पोलिसांनी न्यायालयातील तारखांना वेळोवेळी दांडी मारणार्या तब्बल 16 जणांना गेल्या पंधरा दिवसांत अटक करून कर्जत, श्रीगोंदा, नगर तसेच आष्टी न्यायालयात हजर केले. जमानतीचे वॉरंट असलेल्या 24 जणांनाही अटक करून त्यांना जामीन दिला.
तसेच पोटगीची न देणार्या तिघांना वॉरंट काढून न्यायालयासमोर उभे करून पीडितांना पोटगीची रक्कम मिळवून दिली. याद्वारे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर धाकच निर्माण केला. वेगवेगळ्या घटनांमध्ये कर्जत पोलिस ठाण्यात विविध कलामांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल होतात.पोलिसांकडून हे गुन्हे न्यायालयाकडे वर्ग होतात.
न्यायालयाकडून आरोपींची जामिनावर सुटका होते. मात्र, जामीन झाल्यानंतर आरोपींनी न्यायालयातहजर राहणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांकडून न्यायालयीन तारखांना दांडी मारली जाते. तारखांना गैरहजर राहिलेल्या नागरिकांना हजर करण्यासाठी न्यायालयाकडून पोलिस ठाण्याला वॉरंट दिले जातात. त्यानंतर पोलिस यंत्रणेमार्फत त्या वॉरंटची बजावणी केली जाते.
ज्यावेळी हे वॉरंट बजावूनही नागरिक न्यायालयीन तारखांना हजर राहत नाहीत. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.या बाबीची दखल घेत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अशांंची अटक मोहीम हाती घेतली. कायदा, न्यायालयीन बाबींचे सर्वांना महत्त्व कळावे, कुणाकडूनही त्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी त्यांनी वॉरंटसाठी आखणी केली.
सहायक फौजदार बाळासाहेब यादव, पोलिस हवालदार बाळू पाखरे, पोलिस दीपक कोल्हे यांची याकामी नेमणूक केली. पंधरा दिवसांत न्यायालयात तारखांना हजर नसलेल्या तब्बल 16 जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जमानत 24 वॉरंटमधील 24 लोकांना अटक करून जामीन देण्यात आला.
कौटुंबिक वादातून विभक्त झालेल्या महिलांना न्यायालायकडून पोटगी मिळवून दिली जाते. मात्र, सदरची पोटगी न्यायालयात जमा न करणार्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांनी पोटगीची रक्कम भरल्याने पीडित महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले.
बेजबाबदार लोकांना बसेल कायद्याचा धाक
अनेकवेळा गुन्हा घडल्यावर न्यायालयाकडून जामीन मंजूर केले जातात. मात्र, सबंधितांनी तारखांना हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र, तारखांना हजर नाही राहिल्यास काहीच होत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, पोलिस निरीक्षक यादव यांनी हा गैरसमज दूर करत सुरू केलेल्या अटक मोहिमेमुळे कायद्याचा धाक बसला आहे हे मात्र नक्की!
हे ही वाचा: