चंद्रपूर : डिझेल टॅंकर आणि ट्रकचा भीषण अपघात, आगीत नऊ जणांचा होरपळून जागीच मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : डिझेल टॅंकर आणि ट्रकचा भीषण अपघात, आगीत नऊ जणांचा होरपळून जागीच मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर – मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ डिझेल ट्रँकर आणि लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रॅकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या नऊमध्ये २ वाहन चालक तर ७ जण मजूर आहेत. ही घटना काल गुरूवारी ( दि. १९ मे) च्या रात्रीला घडली. लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील चालकासह सात जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ६ मजूर हे बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली व कोठारी येथील निवासी आहेत. मजूरांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. पोलिस प्रशासनाने केलेल्या चौकशीत होरपळलेल्या चालक आणि मजूरांची ओळख पटविण्यात आली आहे.

चंद्रपूर- मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ काल गुरूवारी ( दि. १९ मे) रोजी मध्यरात्री मुलच्या मार्गे टँकर (एम ४० बिजी ४०६०) क्रमांकाचा हा डिझेल घेऊन जात होता. तर विरूध्द दिशेने लाकडांनी भरलेला ट्रक (एमएच ३१ सीए २७७०) निघालेला होता. दरम्यान अजयपूर गावाजवळ टँकर आणि ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली.

अपघातग्रस्त टँकरमध्ये डिझेल असल्याने व ट्रकमध्ये लाकडे असल्याने दोन्ही वाहनांना अपघातानंतर भीषण आग लागली. क्षणाधार्थ आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे दोन्ही वाहनातील चालक व मजूरांना बाहेर उतरण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक अक्षय सुधाकर डोंगरे (वय ३०, रा. बीटीएस प्लॉट बल्लारशाह) हा आणि ट्रकमध्ये लाकडे भरण्याकरीता असलेले मजूर प्रशांत मनोहर नगराळे (वय २८), कालू प्रल्हाद टिपले ( वय ३५), मैपाल आनंदराव मडचापे (वय २४ ), बाळकृष्ण तुकाराम तेलंग ( वय ४०), साईनाथ बापूजी कोडापे (वय ३५), संदीप रवींद्र आत्राम ( वय २२, सर्व बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली व कोठारी) यांचा अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. तर टँकर वाहनातील टँकर चालक हाफिज खान (वय ३८, रा. अमरावती), टँकरवर मजूर असलेला संजय पाटील (वय ३५, रा. वर्धा) यांचाही होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.

सदर अपघाताची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच या अपघाताची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांची टिम घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीने रौद्ररूपधारण केल्याने चंद्रपूर, बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहनांना बोलाविण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी आज शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत टँकर धगधगत होता. सकाळी अग्निशमन दलाने पुन्हा आग विझविली.

या दरम्यान प्राथमिक तपासात पोलिसांनी चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. परंतु, सखोल करण्यात आलेल्या तपासात ४ नव्हे तर ९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तपास अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविले आहेत. अपघातानंतर मुल – चंद्रपूर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रागा लागलेल्या होत्या. दोन्ही वाहनांची आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली.

हेही वाचलंत का? 

Back to top button