पुणे : पुढारी वृत्तसेवा
तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांची वेगवेगळी नाने ठेवत साठ दिवस फोन टॅप केल्याचे समोर आले आहे. हे फोन टॅप करताना प्रत्येकाला वेगळे नाव देण्यात आले होते. मात्र, चौघांचे सहा मोबाईल क्रमांक टॅपिंगसाठी पाठविताना संपूर्ण माहिती दिली नसल्यामुळे हे नंबर कोणाच्या नावावर आहेत, हे समजू शकले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात तार अधिनियमानुसार शुक्रवारी (दि.25) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्यांचे संभाषण एका पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यांनी काही नेत्यांना 'कोडनेम' दिले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोबाईल क्रमांक अमजद खान या नावाने, विद्यमान शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांचा मोबाईल क्रमांक निजामुद्दीन शेख, माजी आमदार आशिष देशमुख यांचा मोबाईल क्रमांक रघू चोरघे आणि हीना साळुंखे या नावाने, माजी खासदार संजय काकडे यांचा मोबाईल क्रमांक तबरेज सुतार आणि अभिजित नायर या नावांनी 'टॅपिंग'ला लावला होता.
हे नंबर 'टॅपिंग'ला लावताना या कथित गुन्हेगारांचा सहभाग अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत असल्याचा दावाही करण्यात आला होता. या सर्वांचे 60 दिवस मोबाईल रेकॉर्डिंगला लावण्यात आले असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी फोन टॅपिंगची परवानगी घेताना सीएएफ जोडला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे परवानगी देताना क्रमांक कोणाच्या नावावर आहेत, ही गोष्ट लक्षात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फोन टॅपिंगला लावलेल्या चार लोकप्रतिनिधींचे मोबाईल सिमकार्ड हे स्वतःच्या नावावर नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे व आशिष देशमुख या तत्कालीन लोकप्रतिनिधींचे फोन राजकीय हेतूने, जाणीवपूर्वक फसवणूक करून टॅपिंगला लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
– अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे
अमली पदार्थांची तस्करी करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते विकत असल्याचे सांगत काँग्रेस नेते नाना पटोले, बच्चू कडू व आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. तत्कालीन खासदार संजय काकडे हे कुख्यात गुंड बापू नायर टोळीचा सदस्य असल्याचे दाखवून जमीन बळकाविणे, खंडणी, दरोडा असे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे म्हटले होते. पटोले आणि कडू यांचे 18 ऑगस्ट 2017 ते 14 नोव्हेंबर 2017 दरम्यान टॅपिंग केले. काकडे यांचे दोन फोन आणि देशमुख यांचा फोन 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018 या कालावधीत टॅपिंग केले.
मोबाईल टॅपिंग करताना तो कोणाच्या नावावर आहे, त्याचे अधिकृत पत्र जोडावे लागते. यामध्ये असे पत्र जोडले गेले नसल्याचे आढळून आले आहे. कोणताही टेलिफोन टॅप करायचा असेल, तर संबंधित विभागाचे पोलिस निरीक्षक तसा गुप्त अहवाल तयार करून आपल्या वरिष्ठ अधिकार्यामार्फत पोलिस आयुक्तांना जातो. पोलिस आयुक्त हे अपर मुख्य सचिव (गृह) यांना तो अहवाल पाठवून परवानगी घेतात. त्यांच्या मंजुरीनंतर फोन टॅपिंग केले जातात. त्यामुळे या प्रकरणात कोणी हा अहवाल दिला होता, तो कोणामार्फत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे गेला होता, त्या सर्वांकडे चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या गुन्ह्याच्या विवरणात अनिष्ट राजकीय हेतूने जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे म्हटले आहे. तसेच, रश्मी शुक्ला यांनी पदाचा गैरवापर करून कोणाला तरी लाभ मिळवून देण्यासाठी हे केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढील तपासात फसवणूक आणि पदाचा गैरवापर, या कलमांचा समावेश होण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. भारतीय तार अधिनियम कलम 26 नुसार रश्मी शुक्ला व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.