leopard : पन्नास फुटावरुन बिबट्या मादी आणि दोन बछड्यांनी फोडली डरकाळी, पती-पत्नी थोडक्यात बचावले | पुढारी

leopard : पन्नास फुटावरुन बिबट्या मादी आणि दोन बछड्यांनी फोडली डरकाळी, पती-पत्नी थोडक्यात बचावले

राहू ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील राहू येथे मादी बिबट्या आणि तिच्या दोन पिल्लांनी एका शेतकऱ्यांच्या शेतात आढळले. रात्री दहाच्या सुमारास ते पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या आढळला.वेळीच प्रसंगावधान बाळगल्याने जीव वाचल्याचे संतोष काळे आणि त्यांची पत्नी सीमा यांनी  सांगितले. (leopard)

काळे दाम्‍पत्‍याने सांगितले की, “सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेले हाेताे. या वेळी अगदी ५० फुटांच्या अंतरावर बिबट्याची मादी दबा धरून बसली होती. तिचे आणि दोन बछड्यांची तेज डोळे चमकलेले दिसले.तिने डरकाळी फोडली आणि आमच्या अंगाचा  थरकाप झाला. दोन बछडे तिच्या भोवताली होते. आमचे हात पायच जड झाले. बोलतीच बंद झाली. काहीच सूचेना क्षणाचाही विलंब न लावता बिबट्या मादीच्या चेहऱ्यावरती बॅटरीचा उजेड चालूच ठेवला तरीपण बिबट मादी हळूवारपणे आमच्या दिशेने डरकाळी टाकत येत होती. त्यानंतर आम्ही मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली. दोन्ही बॅटरींचा उजेड त्याच्या डोळ्यावरती एकटक लावूनच धरला. जोराचा आवाज सुरुच ठेवला. बॅटरीच्या उजेडाने आणि आमच्या ओरडण्याने बिबट मादीने अचानक दिशा  बदलून दोन बछडांसह उसाच्या शेतात धूम ठोकली”.

संतोष दामू काळे यांच्या शेतामध्ये मंगळवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. परिसरात बिबटयाचा वावर वाढलेला असून तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणीही  मनोज शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे, पांडुरंग खोरकर, गौतम इनकर, आनंदा काळे, सीमा काळे, पांडुरंग टेंगले, बापू शिंदे, संजय खोरकर, सतीश शिंदे, दीपक इनकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून यापूर्वीच बिबट्याने फडशा पाडला आहे. राहू बेट परिसरातील, देवकरवाडी, मगरवाडी, दहिटणे, मिरवडी, वाळकी, पारगाव परिसरात उसाचे अधिक क्षेत्र असल्याने बिबट्याला लपायला अधिक वाव मिळतो. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतातील पीकांना पाणी द्यायला जात नसल्याची परिस्‍थिती आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा, फाटके वाजवा. बॅटरीचा उजेड करा. बिबटया अचानक दिसल्यास पाठलाग करू नका. असे आवाहन वनविभागाने केले आहे.

leopard …हा तर पुर्नजन्मच

असे सीमा संतोष काळे यांनी सांगितले.  त्या म्हणाल्या, “रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी द्यायला गेलो असता बिबट्या मादी आणि दोन बछडे अवघ्या 50 ते 60 फूटावरून दिसले. बिबट्या मादी;  डरकाळी फोडायला सुरूवात. आम्ही बॅटरीचा उजेड त्यांच्या डोळ्यावर चालूच ठेवला मोठमोठ्याने आवाज केल्यामुळे तिने धूम ठोकली. आम्‍ही प्रसंगावधान दाखवल्‍यामुळे माझे पती आणि माझा पुर्नजन्‍मच झाला, अशी भावना  सीमा काळे यांनी व्यक्त केल्या.

leopard ..तर गांधीगिरी करु

दोन दिवसात बिबट्याच्या मादीला, बछड्यांना जेरबंद न केल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर अडवून गुलाब पुष्प देऊ.जर चुकून एखादी विघातक घटना घडल्यास त्याला वन विभागाचे स्थानिक ते वरिष्ठ अधिकारीच जबाबदार राहतील. वन विभागाचे अधिकारी पिंजरा लावण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनोज शिंदे, प्रशांत शिंदे या संतप्त शेतकर्‍यांनी केली.

Back to top button