मोजणीनंतरची ‘क’ प्रत आता मिळणार ऑनलाइन

Maha Bhoolekh
Maha Bhoolekh

शिवाजी शिंदे

पुणे : जमिनीच्या मोजणीनंतर आवश्यक असलेली 'क' प्रत आता ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सुधारणा करण्यास भूमिअभिलेख विभागाने सुरुवात केली आहे. त्यानुसार मार्च, एप्रिल महिन्यापासून ही सुविधा प्रत्यक्षात अमलात येणार आहे.
भूमिअभिलेख विभागाच्या वतीने जमिनीची मोजणी केल्यानंतर संबंधित मोजणीधारकास त्याच्या जमिनीची अत्यंत महत्त्वपूर्ण व आवश्यक असलेली 'क' प्रत प्रत्यक्ष घ्यावी लागते. त्यासाठी नागरिकांना वारंवार भूमापन कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. विशेष म्हणजे 'क' प्रत तयार असली तरी संबंधित कर्मचार्‍यांचे हात ओले केल्याशिवाय 'क' प्रत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी भूमिअभिलेख विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

ही बाब लक्षात घेऊन आणि अधिकारी व कर्मचारी यांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्व सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. त्यानुसार सातबारा, फेरफार व जमिनीचे सर्व प्रकारचे खाते उतारे मागील काही वर्षांपासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मोजणीमध्ये अचूकता यावी यासाठीदेखील रोव्हर्स आणि स्कॉर्स ही यंत्रणा राबविण्यात आली आहे. त्यामुळे मोजणीत अचूकता आली आहे.

'व्हर्जन-२' ही नवीन सुविधा

आत मात्र ऑनलाइन असलेली सर्व यंत्रणा अत्याधुनिक करण्याचे पाऊल भूमिअभिलेख विभागाने उचलले आहे. त्यानुसार आता 'व्हर्जन-2' ही नवीन ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'व्हर्जन-2' या अत्याधुनिक ऑनलाइन सुविधेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामध्ये भूमिअभिलेख विभागाचे संकेतस्थळ उघडल्यानंतर त्यामध्ये हेल्पलाईन डेस्क असणार आहे. त्यामध्ये सर्व माहिती देण्यात येणार आहे.

याशिवाय नागरिकांचे शंका समाधान यालाही स्थान देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोजणीनंतर नागरिकांना आवश्यक असलेली 'क' प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याबरोबरच जमिनीच्या हद्दीचे नकाशेदेखील दिसणार आहेत. 'क' प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची लुडबूड थांबणार आहे. अर्थात 'क' प्रत ऑनलाइन पाहण्यासाठी मोजणी रजिस्टर यादी नंबर टाकावा लागणार आहे.

ही 'क' प्रत सर्व प्रकारची छाननी झाल्यानंतरच डिजिटल स्वाक्षरी पडल्यानंतरच पाहता येणार आहे.मोजणीनंतर नागरिकांना आवश्यक असलेली 'क' प्रत आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना भूमापन कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. ही सुविधा अत्याधुनिक यंत्रणेमध्ये करण्यात येणार्‍या बदलामध्ये म्हणजेच 'व्हर्जन-2' मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. ही ऑनलाइन यंत्रणा मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
                                               – आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news