पुणे : पुढारी वृत्तसेवा
विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यरी यांच्या हस्ते होणार असून हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल अशी माहिती उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनीयावेळी सांगितले.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगित महाविद्यालय स्थापन करण्यात येईल. कलिना कॅम्पस समोरील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 3 एकर जागेवर हे महाविद्यालय उभारले जाईल, तसेच त्यांच्या नावाने एक भव्य संग्रहालयही उभारले जाईल. आजच्या मंत्रीमंडक बैठकीत हा निर्णय झाल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे दिदींचे स्वप्न होते परंतु वेळेत जागा उपलब्ध न झाल्याने ते होऊ शकले नाही यासाठी जी सामिती स्थापन करण्यात आली होती त्याच समितीने आता या महाविद्यालयाचे नाव लता दीनानाथ मंगेशकर ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता.
शांतिश्री पंडित यांची जेएनयुच्या कुलगुरू पदी निवड झालीय. त्याविषयी कोण काय कारवाई करणार याविषयी मी काही सांगू शकत नाही. अशी निवड करतांना अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. केंद्र सरकारची व्हिजिलन्स कमिटी असते. त्यांना विद्यापीठाकडून सर्व माहिती देण्यात आली होती. शांतिश्री पंडित यांच्यावरील आरोप चुकीचे होते का? त्यांची नियुक्ती काशी योग्य ते देशाला कळायला पाहिजे.
या निमित्ताने जे प्रश्न उपस्थित होतात त्याची उत्तरे मिळाली पाहिजेत. मी त्याबाबतचे पत्र केंद्र सरकारला देणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठातील वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासन विचार विनिमय करून अंमलबजावणीचे सूत्र ठरवतील, असे सांगतानाच राज्यातील 15 फेब्रुवारी पर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन होतील. त्यांनंतरच्या परीक्षा कशा घ्यायच्या यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कोणीही मालिन करू शकत नाही, असे सामंत म्हणाले. हिजाब प्रश्नी सुरू असलेल्या गोंधळाबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. एकोप्याचे वातावरण ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.