पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक उच्च न्यायालयात विद्यालय आणि महाविद्यालयात सुरू असलेल्या 'हिजाब'वाद प्रकरणाचा निकाल आजही लागला नाही. सलग दोन दिवस या प्रकरणाची सुनावई सुरू होती. पण, निकाल लागलेला नाही. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे हिजाब प्रकरण पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालय-महाविद्यालयात मुस्लीम मुली हिजाब परिधान करणार की नाही, याचा निर्णय मोठ्या खंडपीठाकडून घेतला जाणार आहे. (हिजाब प्रकरण)
या प्रकरणासंदर्भात घटनात्मक आणि मूलभूत अधिकारांशीसंबंधी मुद्द्यांवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून विचार केला जाणार आहे. कर्नाटकातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये हिजाब विरोधी आणि समर्थक समोरासमोर भिडले आहेत. हा वाद कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यासहीत अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पसरला आहे. काही ठिकाणी हिंसेचाही वापर आंदोलकांकडून झालेला आहे.
कर्नाटकाचे गृहमंत्री अरागा जनेंद्र यांनी बुधवारी काॅंग्रेसवर आरोप केला की, "काॅंग्रेसच्या नेत्यांकडून हिजाब प्रकरणावरून जाणीवपूर्वक तणाव वाढवला जात आहे. ते आगीत तेल टाकण्याचं काम करत आहेत. त्यावर कर्नाटकचे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी या दाव्याचं खंडण केलं आहे. ते म्हणाले की, "एका काॅलेजमध्ये एका विद्यार्थ्याकडून राष्ट्रीय ध्वज उतरवून भगवा झेंडा फडकविला होता", अशी माहिती त्यांनी दिली होती.
मंगळवारी शिमोगाच्या एका शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात एक मुस्लिम विद्यार्थिनी जेव्हा हिजाब परिधान करून आली, तेव्हा भगवी पट्टे घालून काही युवकांनी त्या विद्यार्थिनीला घेरण्याचा प्रयत्न केला. पण, संबंधित विद्यार्थिनीने त्यांचा सामना केला. जेव्हा ते युवक वारंवार 'श्री रामा'च्या घोषणा देत होते तेव्हा संबंधित विद्यार्थिनीहीदेखील ओरडून 'अल्ला हु अकबर'च्या घोषणा दिल्या. मुस्कान नावाच्या या विद्यार्थिनीने आपलं म्हणणं माध्यमांसमोर मांडलेलं आहे. (हिजाब प्रकरण)