सोलापूर : कासेगाव यात्रेत वाहतुकीची कोंडी, पोलिसांकडून नागरिकांना उद्धट वर्तन | पुढारी

सोलापूर : कासेगाव यात्रेत वाहतुकीची कोंडी, पोलिसांकडून नागरिकांना उद्धट वर्तन

लक्ष्मी दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लमा देवीची यात्रा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली असली तरी नागरिक भाविक भक्तांकडून दर्शनासाठी ये-जा चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे कासेगाव यात्रेत वाहतुकीची कोंडी झाली आहे.

भाविकांना व नागरिकांना मंदिर परिसरात येण्यासाठी प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून कासेगावमध्ये येणारे सर्व रस्ते पोलिसांनी अडवले आहेत. यामुळे बाहेर जाण्यासाठी कॅनॉलच्या रस्त्याचा वापर भाविक करत आहेत. परंतु, कॅनॉलचे रस्ते वाहतुकीस अरुंद असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली या ठिकाणी आल्याने पूर्ण वाहतुकीची कोंडी होत आहे.

सदर ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यावर काही नागरिक आम्हास पुढे पंढरपूरला जायचे आहे. आपण आम्हास जाऊ द्या. अशी विनवणी पोलिसांकडे करत आहेत. यावर एका पोलिसाने कोणालाही तेथे आणा आम्ही तुम्हाला पुढे जावू देणार नाही असे म्हटले. तर यातील एका व्यक्तीने त्याच्या वरिष्ठांना फोन करतो असे म्हणत सोलापूरच्या एसपी तेजस्विनी सातपुते यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. यावर पोलिस संतप्त होत कोणालाही फोन करा, एसपी मॅडमना करा, नाही तर आयआयजीला करा. आम्ही तुम्हाला यापुढे जावू देणार नाही असे उद्धट वर्तन पोलीस कर्मचाऱ्यांकडून केले गेले.

वास्तविक पाहता वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर काही अडचण आल्यास पोलिस प्रशासनाने मदत करणे अपेक्षित असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचार्‍यांकडून असे उद्धट वर्तन ऐकावयास मिळाल्याने नागरिक प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर पंढरपूर येथील डीवाय एसपी कदम साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी या घटनेची तात्काळ माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button