सांगली जिल्ह्यातील अठरा घरफोड्यांचा छडा | पुढारी

सांगली जिल्ह्यातील अठरा घरफोड्यांचा छडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी जिज्या ऊर्फ जितेंद्र महिमान्या काळे (वय 29, रा. कवठेएकंद) व अनश्या ऊर्फ अनुशेठ गुरुपाद भोसले (21, एरंडोली) या दोन सराईतांना अटक केली. त्यांच्याकडून 18 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड, असा 6 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला. त्यांनी अठरा ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. एलसीबी पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक गेडाम म्हणाले, पोलिसांचे पथक तासगाव परिसरात सराईत गुन्हेगारांची हजेरी घेत असताना जिज्या काळे याच्याबाबत माहिती मिळाली. तो कवठेएकंद येथील स्मशानभूमीनजीक दागिन्यांच्या पिशवीसह पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडील पिशवीत सोन्याचे आणि चांदीचे दागिने आढळले. अधिक चौकशीत त्याने आपला भाऊ आणि एका साथीदाराच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी चोर्‍या केल्याची कबुली दिली.
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6, इस्लामपूर 2, तासगाव 1 आणि संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2, अशा अकरा ठिकाणी चोर्‍या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या सर्व गुन्ह्यात त्याने चोरलेला ऐवज हस्तगत केला. यामध्ये मनीमंगळसूत्र, बोरमाळ, घंटण, कर्णफुले, सोन्याचे पान, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे करदोडे, पैंजण, जोडवी, वाळे, मेकला, अंगठ्या, करंडा, अशा दागिन्यांचा आणि वस्तूंचा समावेश आहे. एकूण 2 लाख 23 हजार 200 रुपयांचा ऐवज त्याच्याकडून जप्त करण्यात आला.

दरम्यान सराईत चोरटा अनुशेठ भोसले हा आरग परिसरात घुटमळत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे चोरीचे दागिने असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी आरगमध्ये सापळा लावून त्याला जेरबंद केले. त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने सात गुन्हे केल्याची कबुली दिली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2, विश्रामबाग 1, जत 2, विटा 1, कुपवाड औद्योगिक वसाहत 1, अशा सात ठिकाणाहून त्याने चोरलेले सुमारे 4 लाख 900 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या दोन्ही सराईतांना जेरबंद करताना पोलिसांना संबधितांचा पाठलागही करावा लागला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आले असून त्यांच्या चार साथीदारांचा शोध सुरु
आहे.

पथकांमध्ये सहाय्यक फौजदार सुभाष सूर्यवंशी, हवालदार मेघराज रुपनर, हेमत ओमासे, चेतन महाजन, संदीप नलावडे, जितेंद्र जाधव, सचिन धोत्रे, कुबेर खोत, सोहेल कार्तियांनी, सुधीर गोरे, अरुण औताडे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, शुभांगी मुळीक, सुनिता शेजाळे, विनायक सुतार आदींचा सहभाग होता.

चेन चोरटाही जेरबंद

दुचाकीवरून येऊन धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसडा मारून पळविणारा सराईत चोरटा कुरबानअली सरफराज ईराणी (वय 34, खोजा कॉलनी, सांगली) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मंगळसूत्र जप्त करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Back to top button