रतन टाटा यांना केक भरवणारा ‘हा’ तरुण कोण? | पुढारी

रतन टाटा यांना केक भरवणारा ‘हा’ तरुण कोण?

नवी दिल्‍ली : रतन टाटा हे नाव आपल्या देशातील अत्यंत आदरणीय अशा नावांपैकी एक आहे. ‘देशातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक’ इतकीच त्यांची ओळख नाही, तर त्यांचा जमिनीत पाळेमुळे घट्ट रोवून ठेवण्याचा स्वभाव, साधे आचरण, मदतीला धावून जाण्याची वृत्ती, अत्यंत सकारात्मक विचार, देशभक्‍ती या सर्व गोष्टी देशातील जनतेला प्रेरणा देत असतात. टाटा यांनी नुकताच आपला 84 वा वाढदिवस आपल्या लौकिकाला साजेल असाच अतिशय साधेपणाने साजरा केला.

छोट्याशा कपकेकवर लावलेली एकच चिमुकली मेणबत्ती फुंकून त्यांनी हा वाढदिवस केला. या केकचे त्यांनीच मोबाईलवर शूटिंगही केले. त्यावेळी त्यांना केकचा तुकडा बोटांनीच तोडून तोंडात भरवणारा पोरसवदा तरुण पाहून अनेकांना वाटले की हा त्यांचा कुणीतरी जवळचा नातेवाईक असावा. मात्र, या दोघांमध्ये लौकिकार्थाने कोणतेही नाते नसून हा रतन टाटा यांचा अवघ्या 27 वर्षे वयाचा सेक्रेटरी आणि स्वतःही एक उद्योजक आहे. दोघांची चांगली मैत्रीही आहे.

या ‘पुणेकर’ तरुणाचे नाव आहे शंतनू नायडू. एकदा शंतनूला रस्त्यावर मरून पडलेला कुत्रा दिसला. कार चालकाला अंधारात तो दिसला नसल्याने हा अपघात झाला होता. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी शंतनू धडपडू लागला. अशा भटक्या प्राण्यांच्या गळ्यात ते अंधारात चटकन ओळखून यावेत म्हणून चमकदार पट्टा घालण्याची कल्पना त्याला सूचली आणि त्याने हा विचार टाटा यांच्यापर्यंत पोहोचवला. शंतनूचे वडील ‘टाटा अ‍ॅडव्हान्सेस सिस्टीम्स’मध्ये काम करतात तर आई शिक्षिका आहे.

शंतनूची कल्पना टाटांना आवडली आणि त्यांनी शंतनूला ‘मोटोपॉज’ कंपनी सुरू करण्यास मदत केली. रस्त्यावरून भटकणार्‍या कुत्र्यांसाठी आणि गायींसाठी हे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी शंतनू याने टाटा यांच्याशी ई-मेलवरून संवाद साधला होता आणि या संवादाचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघांमध्ये साठ वर्षांचे अंतर असूनही ते आता एकमेकांचे चांगले मित्र बनलेले आहेत. शंतनूचे उच्च शिक्षण कॉर्नेल विद्यापीठात झाले. तो तिकडे शिक्षणासाठी गेल्यावरही दोघांची मैत्री कायम राहिली.

त्याने तिथे एमबीएची पदवी घेतल्यावर पदवीदान समारंभाला स्वतः टाटा दिलेले वचन पाळत हजर होते! तो शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यावर टाटा यांनी त्याला सेक्रेटरी बनण्याची ऑफर दिली. दोघे आताही भटक्या प्राण्यांसाठी एकत्र काम करतात तसेच शंतनू टाटा यांच्या ऑफिसमध्येही काम करतो. त्यानेच टाटा यांना सोशल मीडियात आणले. हॅशटॅग, ट्रेंड, इमोजीसारख्या नव्या कल्पना समजावून दिल्या. आता सोशल मीडियामुळे टाटा यांची वैयक्‍तिक बाजूही लोकांसमोर आली आहे. त्यामध्ये शंतनूचे योगदान मोठे आहे!

Back to top button