देशातील पहिला ओमायक्रॉनचा बळी महाराष्ट्रातील रुग्ण, काय आहे यामागचं सत्य? | पुढारी

देशातील पहिला ओमायक्रॉनचा बळी महाराष्ट्रातील रुग्ण, काय आहे यामागचं सत्य?

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १,२७० वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रातील सर्वांधिक ४५० रुग्णांचा समावेश आहे. देशातील ३७४ रुग्ण ओमायक्रॉन मधून बरे झाले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा व्यक्ती नायजेरियातून आला असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली होती. पण महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सदर व्यक्तीचा मृत्यू कोविडशी संबंधित नाही तर अन्य कारणांमुळे झाल्याचा दावा केला आहे. पण एनआयव्हीच्या अहवालातून सदर व्यक्ती ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पिंपरी-चिंचवडीमधील ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू २८ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात झाला होता. पण या रुग्णाचा मृत्यू ओमायक्रॉनने झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने मान्य केलेले नाही. सदर रुग्णाला गेल्या १३ वर्षांपासून डायबेटीसचा त्रास होता. त्याच्या मृत्यूचे कारण कोविड संबंधित नाही तर अन्य कारण आहे, असे आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालात असे दिसून आले की, त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला होता, असेही आरोग्य प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना कोरोना रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १६,७६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत ७,५८५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ९१,३६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे ही वाचा :

Back to top button