‘मिशन काश्मिर’मध्ये अडीच हजार मोफत शस्त्रक्रिया | पुढारी

‘मिशन काश्मिर’मध्ये अडीच हजार मोफत शस्त्रक्रिया

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा दहशतवादामुळे अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्‍या काश्मीरमध्ये रोटरी क्लबने काश्मीर महसूल विभागातील चार जिल्हा सरकारी रुग्णालयांच्या सहकार्याने 11 ते 18 मे दरम्यान घेतलेल्या शिबिरात 2 हजार 499 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या, अशी माहिती रोटरीचे प्रकल्प संचालक डॉ. राजीव प्रधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. प्रधान म्हणाले, रोटरी क्लबच्या सोलापूर, सातारा, नगर, मराठवाडा, पुणे, रायगड या जिल्ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी प्रकल्पातील 43 सर्जन्स व स्वयंसेवकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला.

काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग पोळे यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’मुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. कुपवाडा, बारामुल्ला, सोपोर, गंदरबल अशा चार जिल्हा सरकारी रुग्णालयात या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. कर्करोग, अस्थीरोग, दंत, नाक, कान, घसा, मूत्रविकार, स्त्रीरोग आदी 11 प्रकारातील शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्या. शिबिराचे औपचारिक उद्घाटन 13 मे रोजी काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले.

रोटरीच्या सर्जन व टीमचे कौतुक करतानाच सिन्हा यांनी पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये दक्षिण काश्मीर मध्ये असेच शिबिर घेण्याची विनंती केल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले. सोलापुरातून या शिबिरात डॉ.संजय मंठाळे, डॉ. सौरभ ढोपरे, डॉ. शशिकांत गंजाळे , डॉ. उमा प्रधान या सर्जन्सनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. पत्रकार परिषदेला डॉ. उमा प्रधान, डॉ. रवींद्र साळुंके, डॉ.संजय मंठाळे, डॉ.सौरभ ढोपरे, डॉ. शशिकांत गंजाळे, हरीश मोटवानी, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.

Back to top button