सोलापूर : एस. टी. स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविली | पुढारी

सोलापूर : एस. टी. स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविली

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अतिक्रमण-विरोधी विभागाकडून अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. गुरुवारी एस.टी.स्थानक परिसरातील अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करतानाच साहित्यजप्तीची कारवाई करण्यात आली. मनपाचे प्रशासक पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार सध्या शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. बुधवारी सात रस्ता परिसरातील फुल व बुके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

तद्नंतर गुरुवारी महापालिकेने आपला मोर्चा शिवाजी चौकाकडे वळविला. एस.टी.स्थानक परिससरात मोठ्या प्रमाणात खोकी असून, यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. मनपाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणांचा पाडाव केला. यावेळी विक्रेत्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले. प्रमुख रस्त्यांबरोबरच भाजी मंडई याठिकाणीदेखील मनपाकडून विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.

याठिकाणी रस्त्यावर बसून भाजी-फळ विक्रीला मज्जाव आहे. तरीदेखील अनेक विक्रेते नियम तोडून व्यवसाय करीत असल्याने मनपाने अशा विक्रेत्यांनादेखील लक्ष्य केले आहे. जप्त केलेले साहित्य विशिष्ट मुदतीत दंड भरुन न नेल्यास या साहित्यांचा लिलाव करण्याची कटू कारवाईदेखील होणार आहे. दरम्यान, अतिक्रमण हटवल्याने या परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. दिवसभरात रहदारीस अडथळा निर्माण झाला नाही. यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

 

Back to top button