कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या हरकत दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिल्याचे सांगून २५ हजारांची लाच घेणार्या तात्यासो धनपाल सावंत (वय ३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
लाचेच्या मागणीस संमती देणार्या गडमुडशिंगीच्या महिला मंडल अधिकारी अर्चना मिलिंद गुळवणी (४७, रा. संभाजीनगर कोल्हापूर) यांचा व कोतवाल युवराज कृष्णात वड्ड (३५) या दोघांचा सहभाग स्पष्ट झाल्याने तिघांना ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीला हरकत घेण्यात आली होती. ही हरकत निकाली काढून तक्रारादाच्या बाजूने निकाल दिल्याचे सांगून वसगडे गावचा कोतवाल तात्यासो सावंत आणि गडमुडशिंगीचा कोतवाल युवराज वड्ड या दोघांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट कालावधीत याची पडताळणी केली.
यानंतर बुधवारी (दि. १) २५ हजारांची लाच स्विकारताना तात्यासो सावंत याला सापळा रचून अटक करण्यात आली. लाच घेण्यास मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांचीही संमती असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतिश मोरे, कॉन्स्टेबल शैलेश पोरे, विकास माने, सुनिल घोसाळकर, रूपेश माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.