नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: संसद अधिवेशन कामकाजास आज प्रारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सदनात विविध विषयांवरून प्रचंड गदारोळ घातला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली. गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले.
अधिक वाचा
सकाळी अकरा वाजता कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विरोधी पक्षांनी संसदेत कठीण प्रश्न उपस्थित करावेत, मात्र त्याचवेळी सरकारला उत्तर देण्याची संधीही द्यावी, अशी टिप्पणी मोदी यांनी केली.
अधिक वाचा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, सर्वांनी कोरोनावरील लसीचा एक डोस घेतला असेल. सदनात येणाऱ्या व अन्य लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर आपण बाहुबली बनता. आतापर्यंत ४० कोटींपेक्षा जास्त लोक लस घेऊन बाहुबली बनले आहेत.
कोरोना महारोगराईने सारे जग आपल्या आवाक्यात घेतले आहे. अशावेळी महारोगराईवर सुद्धा संसदेत चर्चा झाली पाहिजे.
विरोधी पक्षांकडून जे सल्ले दिले जातील, त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ मिळणार आहे.
महारोगराईच्या अनुषंगाने देशातील जनतेला आवश्यक उत्तरे देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे मोदी म्हणाले.
पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर महिला, दलित आणि आदिवासी समाजातले लोक केंद्रात मंत्री बनलेले आहेत. ही बाब काही लोकांच्या पचनी पडली नसल्याची टीका मोदी यांनी लोकसभेत केली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोदी नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करून देत होते. पण विरोधी पक्षांनी यावेळी प्रचंड गदारोळ करीत घोषणाबाजी केली. विरोधकांचा पवित्रा पाहून मोदी यांनी त्यांचे वाभाडे काढले.
महिला, दलित, आदिवासी समाजातले लोक मोठ्या प्रमाणावर मंत्री बनले आहेत. संसदेत त्यामुळे उत्साह असेल, असा माझा अंदाज होता.यावेळी कृषी, ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आमचे सहकारी, ओबीसी समाजातल्या नेत्याना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पण देशातील महिला, ओबीसी, शेतकऱ्यांची मुले मंत्री बनल्यानंतर काही लोकांना आनंद होत नाही. यासाठीच ते मंत्र्यांची ओळख करू देत नसल्याचा आरोप मोदी यांनी केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोरोना संकट, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले दर, राफेल सौदा आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलेला आहे.
आजच्या कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी राजदने कोरोना संकटावर चर्चा करण्याच्या मागणीची नोटीस दिली होती.
काँग्रेस, तृणमूल, आम आदमी पक्ष तसेच इतर विरोधी पक्षांनी इंधन दरवाढ, कृषी कायदे, लसीकरण, अर्थव्यवस्था आदी मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी केली होती.
हेही वाचलं का?