गेल्या शंभर वर्षांत चिनी कम्युनिस्ट पक्षाने चीनला एक शक्तिशाली देश म्हणून नावारूपाला आणले. चिनी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच चिनी जनतेला असा विश्वास देत राहतो की, आपला पक्ष चीनसाठी एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. यामुळे आपोआपच या पक्षाला 'अमरत्व' प्राप्त होते.
चिनी कम्युनिस्ट पक्षाने शंभरावा स्थापना दिन साजरा केला. या शंभर वर्षांत चिनी कम्युनिस्ट पक्षानेchina communist partyचीनला जगाच्या नकाशावर एक शक्तिशाली देश म्हणून नावारूपाला आणले. चीनच्या प्रखर विरोधी देशांचेही याबाबत दुमत असणार नाही. एका अभ्यासानुसार, चीनने गेल्या 50 वर्षांत सिमेंट आणि लोखंडाचा जेवढा वापर केला आहे, तेवढा वापर करण्यास अमेरिकेला दोनशे वर्षे लागली. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास जे उद्दिष्ट साध्य करण्यास पाश्चात्त्य आणि अन्य देशांना शेकडो वर्षे लागली, ते चीनने अवघ्या काही वर्षांत पूर्ण केले.
सत्तेवर कायम राहण्यासाठी तसेच आपली उपयुक्तता निरंतर कायम राखण्यासाठी गेल्या शंभर वर्षांत चिनी कम्युनिस्ट पक्षाला बर्याच चढ-उतारांमधून वाटचाल करावी लागली. गरिबीमुक्त चीन हे कम्युनिस्ट पक्षाचे दोनशे वर्षांच्या लक्ष्यांमधील एक होते आणि शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या आतच पक्षाला ते साध्य करून दाखवायचे होते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी याच वर्षी चीन गरिबीमुक्त झाल्याची घोषणा केली. दारिद्य्ररेषेखालील उर्वरित 10 कोटी ग्रामीण जनतेला गरिबीच्या रेषेवर आणल्याचा दावा केला. एवढेच नव्हे तर 832 सूचित गरीब काऊंटींना तसेच 1.28 लाख गावांना आता गरिबीच्या सूचीतून हटविले. काही जाणकार चीनच्या या दाव्यांवर, गरिबीच्या रेषेचे निर्धारण करण्याच्या चीनच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. चिनी कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आल्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे 2149 पर्यंत चीनला आणखी एक लक्ष्य गाठावयाचे आहे, ते म्हणजे 'चीनला एक असा आधुनिक समाजवादी देश बनवायचे आहे, जो समृद्ध, मजबूत, लोकशाहीवादी, सांस्कृतिकद़ृष्ट्या संपन्न आणि सामंजस्यपूर्ण असेल.' या ठिकाणी 'लोकशाहीवादी' या शब्दाचा अर्थ निवडणूकप्रधान लोकशाहीच्या पाश्चात्त्य संकल्पनेशी संबंधित नाही. याचाच अर्थ असा की, चिनी कम्युनिस्ट पक्ष सत्तेवरून एवढ्यात पायउतार होणार नाही.
चिनी कम्युनिस्ट पक्षाची परिस्थिती सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षासारखी का झाली नाही? सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा की, चिनी कम्युनिस्ट कायम आपल्या पक्षाची संरचना आणि अंतर्गत प्रक्रियेत बदल करीत राहिले. नवीन सदस्यांना प्रवेश देताना चिनी कम्युनिस्ट पक्षाने कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाने सजग द्वारपालाप्रमाणे प्रत्येक सदस्याची शहानिशा करूनच त्याला पक्षात येऊ दिले. विस्तृत प्रक्रियेतून गेल्यानंतरच एखादी व्यक्ती चिनी कम्युनिस्ट पक्षाची सदस्य होऊ शकते. ही प्रक्रिया अनेकदा वर्षानुवर्षे चालते. इच्छुक लोकांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर अन्य स्तरांवरही चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्यांचा सामाजिक विचार, नैतिकता, पक्षाबद्दलची निष्ठा हे सारे काही वर्षभर चालणार्या प्रक्रियेत आणि प्रशिक्षणादरम्यान तपासले जाते.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नवीन सदस्याचे सामाजिक उत्तरदायित्वही तपासले जाते. हायस्कूलच्या विद्यार्थ्यापासून नोकरदार वर्गापर्यंत सर्वच जण चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनू इच्छितात. पक्षाचा सदस्य होण्याचे अगणित फायदे आहेत. नोकरीपासून पदोन्नतीपर्यंत बरेच लाभ मिळतात. एवढेच नव्हे तर पक्षाचे महासचिव असलेल्या सध्याच्या चीनच्या राष्ट्रपतींनाही पक्षसदस्य बनण्यासाठी अनेकदा अर्ज करावा लागला होता. वस्तुतः जिनपिंग यांचे पिता शी चोंगशुन पक्षाचे वरिष्ठ नेते होते, तरीसुद्धा शी जिनपिंग यांना या कठोर प्रक्रियेतून जावे लागले. याच कारणामुळे 139 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये केवळ 9.5 कोटी लोकच चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत.
पक्षात भ्रष्ट नेते आणि कार्यकर्त्यांवर अंकुश लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालविली होती. अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात जावे लागले. अनेकांनी शी जिनपिंग यांची ही कारवाई म्हणजे विरोधकांना संपविण्याचा डाव असल्याचा आरोप केला; परंतु चिनी जनतेने पक्ष आणि देशासाठी ही कारवाई उचित मानली. चिनी कम्युनिस्ट पक्षात अंतर्गत संतुलन साधण्याचे काम पक्षाच्याच विविध शाखा करतात. एकीकडे युवा नेत्यांवर (ज्यांचे वडील पक्षाचे बडे नेते होते अशा नेत्यांवर) पक्षाच्या युवा लीगच्या सामान्य सदस्यांचा दबाव असतो. मात्र, क्षेत्रीय शाखांमध्ये (उदा. शांघाय, चचियांग इ.) रस्सीखेच सुरू असते. या व्यतिरिक्त चिनी कम्युनिस्ट पक्ष आपल्या देशवासीयांना सातत्याने असे सांगत असतो की, चीनच्या बाहेर सर्वत्र जनता दुःखी-कष्टी आहे, उपासमार आणि गरिबी वाढली आहे. आजार वाढले आहेत आणि लोकशाही हतबल झाली आहे. दुसरीकडे, चिनी कम्युनिस्ट पक्ष चिनी जनतेला असा विश्वास देत राहतो की, पक्ष चीनसाठी एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. यामुळे आपोआपच चिनी कम्युनिस्ट पक्षाला 'अमरत्व' प्राप्त होते.