रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांच्या सीमा निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेमध्ये बदल होणार आहे. जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपलेल्या 50 व जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या 223 अशा एकूण 273 ग्रामपंचायतींसह नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार आवश्यक ती कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने करून प्रारूप रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी 14 फेब्रुवारीपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभागाच्या सीमा निश्चितीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे. तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे हे 31 जानेवारी 2022 करणे बंधणकारक होते. संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करण्याची मुदत दि. 4 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती.
14 फेब्रुवारीपर्यंत समितीने प्रभागाची सीमा दर्शविणारा प्रारूप प्रस्ताव उपविभागीय अधिकार्यांमार्फत जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाचा आहे. दि. 18 फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकार्यांनी नमुना 'ब'ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करणे व मान्यता देणे बंधनकारक आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचनेला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी. प्रारूप प्रभाग रचनेला (नमुना ब) व्यापक प्रसिध्दी देऊन तहसीलदारांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत जाहीर सूचना प्रसिध्द करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्यासाठी 4 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. दि. 7 मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकार्यांकडे सादर केल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकार्यांनी दि. 15 मार्च 2022 पर्यंत सुनावणी घेणे आवश्यक आहे. आलेल्या प्रत्येक हरकतीवर व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी दि. 21 मार्चपर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करावयाचा आहे.
प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकार्यांनी प्रभाग सीमा दर्शविणार्या अंतिम अधिसूचनेला दि. 25 मार्चपर्यंत मान्यता द्यावयाची आहे. जिल्हाधिकार्यांनी मान्य केलेल्या अंतिम अधिसूचनेस दि. 29 मार्च पर्यंत (नमुना अ) मध्ये व्यापक प्रसिध्दी देण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व नगर परिषद प्रभागांच्या रचनांप्रमाणेच ग्रामपंचायत प्रभाग रचनांमध्येही बदल होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमधील इच्छुक याकडे डोळे लावून बसले आहेत. आता नवीन रचनेनुसार राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहे.
हेही वाचलतं का?