

मंडणगड ; विनोद पवार : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात देशाचे 14 वे महामहीम राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांचे दि. 12 रोजी आगमन होणार आहे. मंडणगडमधील आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीच्या दर्शनानिमित्त त्यांचे जिल्ह्यात आगमन होणार असून संपूर्ण मंडणगड तालुक्याने त्यासाठी रेड कार्पेट अंथरले आहे. त्यामुळे या दौर्याबद्दल जिल्ह्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रत्नभूमीत भेट देणारे ते पहिले राष्ट्रपती ठरणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला रत्नांची खाण म्हटले जाते. या जिल्ह्यातील चार जणांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळाला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्याला राष्ट्रपतींचा पदस्पर्श होणार आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये या दौर्याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
दौर्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा पाच दिवस आधीपासूनच मंडणगडमध्ये दाखल झाली असून मंडणगड शहर व आंबडवे मार्गावर पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. बॉम्ब शोध पथक, श्वान पथक या सहीत अनेक सुरक्षा यंत्रणा मंडणगडमध्ये तळ ठोकून आहेत तर दुसर्या बाजूला राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी आवश्यक ती तयारी करण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गेले काही दिवस येथे मेहनत घेत आहे. प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रपती दाखल होत असल्याने शासकीय कर्मचार्यांमध्ये देखील वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. प्रशासनातील सर्वोच्चस्थानी असलेल्या व्यक्तीच्या दौर्यात सामील होण्याचा मान या अधिकारी व कर्मचार्यांना मिळाला आहे. त्यामुळे यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.
राष्ट्रपतींचा दौरा अनेक राजशिष्टाचाराने नियंत्रित असतो. या राजशिष्टाचाराप्रमाणेच त्याचे काटेकोर पालन केले जाते. त्यानुसार राष्ट्रपतींचा दौरा सुरक्षेच्या कारणासाठी कधीही जाहीर केला जात नाही हे या दौर्याचे विशेष असते. त्यामुळे अन्य राजकीय पुढार्यांच्या दौर्याप्रमाणे तो जाहीर होत नाही. आंबडवे येथे सुमारे एक तासाचा कार्यक्रम होणार आहे. आंबडवेमध्ये काही विशिष्ट लोकांच्या उपस्थितीतच राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देतील. यानंतर आंबडवे हायस्कूलमध्ये कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मर्यादीत संख्येतील लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींनी जिल्ह्यासह मंडणगड तालुक्यास भेट देण्याची ही पहिलीच वेळ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळामुळे ही संधी तालुक्यास प्राप्त झाली आहे. यामुळे तालुक्याच्या लौकीकात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. तालुक्यातील शिरगाव येथे राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी चार स्वतंत्र हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. त्याच ठिकाणी स्वच्छतागृह व इतर सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. तेथे सुरक्षेची अत्यंत चोख व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. श्वानपथक व बॉम्बशोधक पथक पाचारण करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे अलिशान सभा मंडप उभारण्यात येत आहे. या सभागृहातील मंडपात केवळ मोजक्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना अधिकृत प्रवेश दिला जाणार आहे, त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आंबडवे येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला रंगरंगोटी केली जात आहे. स्मारकाच्या आतील बाजूला नवीन विजेच्या जोडण्या करण्यात येत आहेत.
शिरगाव ते आंबडवे या दरम्यान 22 कि.मी. च्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता केली जात आहे. रस्त्याच्या बाजूपट्ट्या मातीचे भराव टाकून रोलिंग केल्या जात आहेत. या दरम्यान सार्वजनिक वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णतः बंद राहणार आहे. मंडणगड नगर पंचायतीचे कर्मचारी शहरातील संपूर्ण रस्ते स्वच्छ करीत आहेत.
आंबडवे येथील हायस्कूलच्या इमारतीला व वर्गखोल्यांना रंगरंगोटी केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडूक खुर्दचे प्राथमिक शिक्षक वैभव रमेश धुमाळ यांनी स्वतः आपल्या कुंचल्यातून सर्वच महापुरूष व विद्यमान राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. या प्रतिमा लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.