औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे याच्याविरुद्ध विद्यार्थिनिशी व्हॉट्सअॅपवर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. ९) गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या पीडितेने मराठवाडा विद्यापीठ विशाखा समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी काहीही चौकशी न केल्यामुळे अखेर पीडितेने बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय पीडित विद्यार्थिनी विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेते.
२७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी विद्यापीठाची माहिती घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे याच्याकडे गेली होती. तेव्हा शिंदे याने तिला माहिती दिली.
मात्र, त्यापूर्वी शिंदेला फोन करुन विद्यार्थिनीने भेटण्यासाठी वेळ घेतली होती. तेव्हा विद्यार्थिनीचा मोबाइल क्रमांक शिंदेकडे गेला होता.
३ सप्टेंबरला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शिंदे याने विद्यार्थिनीच्या मोबाइल क्रमांकावरील व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरु केले. 'हाऊ आर यू डिअर विनिता (नाव बदललेले आहे), प्लीज डोन्ट माइंड बट यू आर सो ब्युटीफूल' असा मेसेज केला.
शिंदेचा कारनामा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने विद्यार्थिनीशी पुढे चॅटिंग सुरु ठेवत 'तू मला पहिल्या नजरेत आवडलीस, तूझं वय काय २० की २५, तुझ्याशी मैत्री करायची आहे', असा मेसेज पाठविला. त्याला विद्यार्थिनीने नाही, असे उत्तर दिले.
त्यावर शिंदे याने 'काय नाही, बोल ना.. राग आला का? असे वेगवेगळे मेसेज रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरु ठेवले.
या प्रकारामुळे विद्यार्थिनी तणावात असून विद्यापीठातील अधिकाऱ्यानेच असा घृणास्पद प्रकार केल्याने संताप व्यक्त होत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार हे करीत आहेत.