पुढारी ऑनलाईन डेस्क : बुलडाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांचे जिवलग मित्र आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते राणा चंद्रशेखर चंदन यांचे आज (दि.०९) सकाळी निधन झाले.
राणा यांच्या निधनाने बुलडाणा परिसरात शोककळा परिसरली आहे. रविकांत तुपकर आणि राणा यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्ह्यात आपले स्थान बळकट केले होते. परंतु या दृढ मैत्रीतील अचानक एक तारा निखळल्याने रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना मोठा धक्का बसला आहे. तुपकर यांनी राणा यांच्या आठवणींना उजाळा दिला.
रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट नातं असतं. ते म्हणजे मैत्रीचं, सोबतीचं, सहवासाचं… माझा सहकारी, मित्र राणा चंद्रशेखर चंदन आज वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आम्हाला सोडून गेला. गेल्या १८ दिवसांपासून त्याच्यावर औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
आठवडाभरापूर्वी तो पूर्ण बरा होईल अशी परिस्थिती होती मात्र त्याची तब्बेत पुन्हा खालावली आणि ही झुंज मात्र अपयशी ठरली. त्याच्यामागे दोन लहानग्या मुली आहेत, त्यांच्याकडे पाहून मनाला अतिशय वेदना होत आहेत.
राणा चंदन गेली १० वर्षे सतत माझ्यासोबत सावलीसारखा काम करत होता. माझी सकाळ त्याच्या गुड मॉर्निंगच्या फोनने व्हायची. नंतर दिवसभर आमचे एकमेकांना १५-२० फोन होत असत. मी राज्यात दौऱ्यावर असतांना इथला सगळा कारभार तोच बघायचा. माझा शब्द कधीही पडू न देणारा माझ्या सख्ख्या भावासारखाच राणा सतत माझ्यासोबत असायचा.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच तो प्रिय होता. कोणत्याही रक्तगटाच्या रक्ताची कुणाला गरज लागली तर त्याच्याकडे हमखास मिळणार हे माहित असायचं. चालतीबोलती रक्तपेढी असाच त्याचा लौकिक झाला होता.
अगदी शहरातील खाजगी डॉक्टरही त्याला रक्ताच्या उपलब्धतेसाठी हक्काने फोन करत असत.
कोरोनाच्या काळात तर त्याने रात्रंदिवस लोकांची मदत केली.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना दाखल करून देणे, त्यांना डबे पोहोचवणे अशी कामं तो निस्वार्थपणे करत राहिला.
कुणाचा अपघात झाला तरी सगळ्यात आधी हा मदत करायला, दवाखान्यात भरती करायला हजर असायचा.
आजवर हजारो रुग्णांचे प्राण त्याने वाचवले मात्र या आजारपणात त्याचे प्राण मात्र वाचले नाहीत.
जिल्हाभरातून कुणाचंही काम असेल तर राणाजीला सगळ्यात आधी लोक संपर्क साधत. तहसील, पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी अशा कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना घेऊन जाणे, सर्वसामान्यांची अडकलेली कामे करून देणे या गोष्टी तो सहज करायचा.
प्रशासकीय कार्यालयांत त्याचा चांगला दबदबा होता, तो गेला की अशक्यातील अशक्य कामही शंभर टक्के होत असे.
राणाजीने आपलं तारुण्य चळवळीसाठी अर्पण केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
तरुणांच्या गळ्यातला तर तो ताईत होता. 'शेतकऱ्यांचा राणा' अशी त्याची ओळख होती.
बहुआयामी असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अगदी किरकोळ प्रचार करून व काहीही खर्च न करता त्याला प्रस्थापितांच्या तोडीचे मतदान झाले, एवढी त्याची लोकप्रियता होती.
असा कार्यकर्ता तयार होणे फार दुर्मिळ आहे. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या व स्वादुपिंडाच्या आजारपणाला त्याने मोठी झुंज दिली.
मीही दवाखान्यात त्याच्यासोबत होतो. याकाळातही तो शेतकऱ्यांची चळवळ, तरुणांच्या आंदोलनांबद्दल बोलत होता. 'आंदोलनसम्राट' म्हणून त्याची एक वेगळीच ओळख होती.
आज त्याचा जाण्याने पोरकेपणाची, हतबलतेची भावना मनात साठून राहिली आहे.
चळवळीचं मोठं नुकसान झालंच आहे पण माझं वैयक्तिक पातळीवर, कुटुंबाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे. त्याच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो.
आज त्याला निरोप देतांना "तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना.. याद करेगी दुनिया तेरा-मेरा अफसाना.." या ओळी मनात रुंजी घालत आहेत.
अलविदा राणा, मित्रा!